Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शबरीमाला मंदिराबाहेर हिंसाचार: महिला, कॅमेरामन जखमी
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: na1
5केरळ, दि. 6 (वृत्तसेवा) : शबरीमाला मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्यानंतरही मंगळवारी सकाळी हिंसक आंदोलन झाले. या हिंसक आंदोलनादरम्यान एक 52 वर्षीय महिला जखमी झाली. यावेळी काही पत्रकारांना लक्ष्य करण्यात आले. 10 ते 50 वयोगटातील महिला अयप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजल्यानंतर नादापांडाल येथे गोळा झालेल्या भक्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. महिलांना मंदिरात शिरण्यास जोरदार प्रतिबंध करण्यात आल्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी भक्तांनी केलेल्या हल्ल्यात स्थानिक वृत्तवाहिनीचा चालक आणि कॅमेरामन, असे दोघे जखमी झाले आहेत तर हल्ल्यात जखमी झालेल्या 52 वर्षीय महिलेचे नाव ललिता आहे.  ती थ्रिसूर येथील रहिवासी आहे. ही महिला 10 ते 50 वयोगटातील नसून ती आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी आली होती. पोलीस संरक्षणात नंतर या महिलेला मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली.   
या मंदिरात सर्वच वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शबरीमाला मंदिर आणि पंबा व निलक्क्ल येथील तळांवर रविवारपासून कलम 144 लागू करण्यात आले असून ते मंदिर बंद होईपर्यंत म्हणजे मंगळवारी रात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: