Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गोवर आणि रुबेला लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज
ऐक्य समूह
Tuesday, November 27, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: lo3
लसीकरणातून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता : संजीवराजे
 5सातारा, दि.26 : आरोग्य विभागामार्फत दि.27 नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. ही मोहीम 5 आठवडे चालणार आहे. या मोहिमेदरम्यान 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुला-मुलींना या लसीचा डोस देण्यात येणार आहे. ही लस सर्व खासगी शाळा व शासकीय शाळांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकही मूल या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सुधाकर कोकणे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.
सुरुवातीला दोन आठवडे ही मोहीम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुले, मुली व शालेय मोहिमेदरम्यान लसीकरण न झालेल्या लाभार्थींना विशेष बाह्य संपर्क सत्रामधून लसीकरण करण्यात येणार आहे तसेच अति जोखमीच्या भागामध्ये व ऊस तोड कामगारांच्या लाभार्थींनाही फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्यात येणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले.
डॉ. कैलास शिंदे म्हणाले,  1916 मध्ये भारतात आढळलेल्या 18 हजार 663 रुग्णांपैकी  41 टक्के रुग्णांनी गोवर लस घेतली नसल्याचे आढळून आले आहे. 2017 मध्ये भारतात आढळलेल्या 12032 रुग्णांपैकी 42 टक्के रुग्णांनी ही लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे  गोवर व रुबेलाच्या विषाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी  भारतात टप्प्याटप्प्याने सर्व राज्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. 9 महिने ते 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या मुलांच्या पालकांनी गोवर आणि रुबेला लस आपल्या पाल्यांना द्यावी.
गोवर आणि रुबेला लसीकरणाबाबत
जिल्हाधिकार्‍यांचे जनतेला आवाहन
9 महिने व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना गोवर आणि रुबेला लस देण्याची मोहीम 27 नोव्हेंबरपासून 4 जानेवारी 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार 855 शाळेतील 4 लाख 53 हजार 660 मुलांना तर बाह्य लसीकरणाद्वारे 4 लाख 129 अशा एकूण 8 लाख 53 हजार 789 मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी शाळांमधून 4 हजार 869 लसीकरण सत्र, 3 हजार 113 बाह्यसंपर्क लसीकरण सत्र, संस्थास्तरीय 930 लसीकरण सत्र असे एकूण 9 हजार 130 लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. आपल्या मुलाच्या निरोगी आयुष्यासाठी गोवर आणि रुबेला लस द्यावी. ही मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.     

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: