Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकर्‍यांचे आंदोलन विरोधकांकडून ‘हायजॅक’
ऐक्य समूह
Saturday, December 01, 2018 AT 11:49 AM (IST)
Tags: na1
मोदी सरकारवर खरपूस टीका
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : देशातील कृषिक्षेत्रावर ओढवलेले आर्थिक संकट आणि शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे 21 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी दिल्लीत दाखल झालेला ‘किसान मुक्ती मोर्चा’ भाजपच्या राजकीय विरोधकांनी ‘हायजॅक’ केल्याचे चित्र आज पहायला मिळाले. आगामी लोकसभा निवडणूक आणि राजस्थान, तेलंगण विधानसभांसाठी 7 डिसेंबरला होणारे मतदान, या पार्श्‍वभूमीवर या मोर्चात विरोधकांची एकजूटही पाहायला मिळाली. सर्व विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवताना हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, समाजवादी नेते धर्मेंद्र यादव, तृणमूलचे नेते दिनेश त्रिवेदी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांनी ‘किसान मुक्ती मोर्चा’त सहभागी होऊन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मोदी 15 श्रीमंत मित्रांचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे रुपयांचे कर्ज माफ करतात. मात्र, ते गरीब शेतकर्‍यांना कर्जमाफी देत नाहीत. शेतकरी केंद्र सरकारकडे फुकटात किंवा भेट म्हणून काही मागत नाहीत तर ते त्यांचा हक्क मागत आहेत. कोणता विमा निवडावा हा अधिकारसुद्धा शेतकर्‍यांना नाही. केंद्र सरकारने शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. मोदींनी देश अंबानी आणि अदानी यांना वाटून दिला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
शेतकर्‍यांचे सर्व कर्ज आहे तितके कर्ज माफ करावे. स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, अशा मागण्या अरविंद केजरीवाल यांनी केल्या. मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. या सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत तर आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकरी तुम्हाला पराभूत करतील, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला. मोदी सरकारने शेतकर्‍यांवर प्रचंड अन्याय केला आहे. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. हजारो कोटी बुडवणार्‍या उद्योगपतींना सरकार कर्जमाफी देते; पण शेतकर्‍यांना कर्जमाफी देत नाही. या सरकारला धडा शिकवावा लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
दरम्यान, देशभरातील हजारो शेतकर्‍यांनी आज रामलीला मैदानावरून संसद मार्गावर मोर्चा काढला. यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   
दुष्काळामुळे होणारे नुकसान आणि कर्जमाफीच्या नावाखाली दिशाभूल झाल्यामुळे या मोर्च्यात सहभागी झाल्याचे या शेतकर्‍यांनी सांगितले. या मोर्चात 207 शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी सहभागी झाल्याचा दावा अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीने (एआयकेएससीसी) केला. आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश यासह 20 राज्यांमधील शेतकरी सहभागी झाल्याचा दावा समितीने केला. यापूर्वी गांधी जयंतीला 2 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांनी दिल्लीवर धडक मारली होती. मात्र, दिल्लीच्या वेशीवर त्यांचा मोर्चा अडवून लाठीमार व अश्रुधुराचा मारा करण्यात आला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: