Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फ्रान्स सरकारचा आणीबाणी लागू करण्याचा विचार
ऐक्य समूह
Monday, December 03, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: na1
5फ्रान्स, दि. 2 (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून फ्रान्स हिंसक चळवळीला सामोरा जात आहे. महागाई आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या विरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे. शनिवारी ही परिस्थिती आणखी चिघळली. सेंट्रल पॅरिसमध्ये आंदोलनकर्त्या युवकांनी अनेक वाहने आणि इमारतींना आग लावली. सरकार या परिस्थितीशी लढण्यासाठी आणीबाणी लागू करण्याचा विचार करत असल्याची माहिती फ्रान्स सरकारचे प्रवक्ता बेंजामिन ग्रीवोक्स यांनी युरोप वन रेडिओवर बोलताना दिली.
या आंदोलनकर्त्यांना ‘यलो जॅकेट’ आंदोलक म्हटले जात आहे. या आंदोलकांनी गाड्या, इमारतींच्या काचा फोडल्या, दुकाने लुटली. करांमधली वाढ, महागाई आणि त्यामुळे वाढलेला राहणीमानाचा खर्च याला कंटाळून जनतेने हा रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे. पोलीस या आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधूर, पाण्याचा वापर करत आहेत. शहरातली अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत.  
या आंदोलनात आतापर्यंत 133 जण जखमी झाले आहेत तर 412 जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन रविवारी उशिरा पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांसोबत एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. आंदोलनकांची चर्चा कशी करायची, हिंसक परिस्थिती कशी हाताळायची याबाबतची चर्चा या बैठकीत होणार आहे. या आंदोलकांना कोणतेही नेतृत्व नसल्याने चर्चेला नक्की कोणाशी आणि कशी सुरुवात करायची याचा धोरणात्मक विचार केला जाणार आहे. याच बैठकीत आणीबाणी लागू करण्याच्या पर्यायावरही विचार केला जाणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: