Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ओबीसी आरक्षणाच्या फेररचनेची मागणी
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्याने त्यांना कुणबी म्हणून इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातून आणि मराठा म्हणून सामाजिक व शैक्षणिक (एसईबीसी) या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षणाचा दुहेरी लाभ मिळणार आहे, असा काही ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धोका पोहोचणार असल्याने ओबीसी आरक्षणाची फेररचना करण्यात यावी, या मागणीसाठी लातूरमध्ये ओबीसींच्या 16 संघटना एकत्र आल्या आहेत.
मराठा समाजाला ‘एसईबीसी’ या विशेष प्रवर्गातून आरक्षण दिल्याने त्याचा ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होणार असल्याने ओबीसींममध्ये भीती आणि संशयाचे वातावरण आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय लाभ घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. या मुद्द्यावर ओबीसी संघटना एकत्र येऊन व्यापक बैठक घेणार आहेत. त्यातून लढ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे या संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.  
स्वातंत्र्यापूर्वी 1931 मध्ये देशात जातनिहाय जनगणना झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात मराठा समाज 32 टक्के असल्याचे मानण्यात आले होते. त्यामध्ये मराठा आणि कुणबी या दोन्ही समाजांचा समावेश होता. मात्र, सध्या कुणबी वगळून मराठा समाज 32 टक्के असल्याचे समजून विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले आहे. कुणबी समाजाला पूर्वीपासून ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाची फेररचना करण्यात यावी, अशी या संघटनांची मागणी आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: