Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यात मेगा भरतीची प्रक्रिया सुरू
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: mn1
72 हजार पदांसाठी फेब्रुवारीत परीक्षा?
5मुंबई, दि. 4 (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण विधेयक संमत होईपर्यंत थांबवण्यात आलेली राज्यातील 72 हजार पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची तर पुढील आठवड्यात या संदर्भातील जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रालयात बैठक घेऊन संभाव्य मेगा भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. यातील सर्वाधिक जागा ग्रामविकास व आरोग्य विभागात असून गृह, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातही मोठ्या प्रमाणावर पदे भरण्यात येणार आहेत.
ही भरती विभागनिहाय होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील 72 हजार पदांच्या भरतीची कार्यवाही कशी करायची, याचा आढावा मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज घेतला. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरू असून त्यानंतर या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा क्रांती ठोक मोर्चाने राज्यातील मेगा भरती थांबवण्याची मागणी केली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या भरतीला स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्व समाजांचे हित जपूनच मेगा भरती सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गेल्या आठवड्यात संमत झाल्यानंतर त्यावर राज्यपालांचीही मोहोर उठली आहे. मराठा आरक्षणाचा कायदा राजपत्रातही प्रसिद्ध झाल्याने आता मेगा भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सचिव गटाकडून सातत्याने आढावा
राज्य शासनाच्या कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांमध्ये क्षेत्रीय स्तरावरील 72 हजार पदे भरण्याच्या कार्यवाहीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिव गटाची मंत्रालयात दररोज बैठक होत आहे. मराठा आरक्षण कायदा अंमलात आल्याने या भरतीच्या प्रक्रियेस गती आली आहे. मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या सचिव गटात सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणीपुरवठा, वने या विभागांचे सचिव आहेत. मुख्य सचिवांकडून भरती प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.
या पदांमध्ये ग्रामीण भागातील क्षेत्रीय स्तरावरील विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी अचूक नियोजन केले जात आहे. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर पुढील आठवड्यात या भरती प्रक्रियेसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये भरतीसाठी परीक्षा घेण्यात येईल, असे मुख्य सचिव जैन यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये तब्बल आठ वर्षांनी नोकरभरती होत आहे. यामध्ये 2019 साली 36 हजार आणि 2020 मध्ये 36 हजार पदे भरण्यात येणार आहेत. भरती झालेल्यांना शिक्षण सेवकांच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनावर काम करावे लागणार असून त्यानंतर कामगिरी आणि पात्रतेनुसार सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतले जाणार आहे.
शासनाचे विभाग आणि पदे
या मेगा भरतीत कृषी विभागातील कृषी सेवा वर्ग 1 व 2, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागातील सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व पशुधन पर्यवेक्षक, परिचर, दुग्धविकास अभियांत्रिकी (कनिष्ठ), दुग्धसंवर्ध, प्रारण, दुग्धशाळा आणि कृषी पर्यवेक्षक, दुग्धसंकलन विकास अधिकारी आणि तंत्रज्ञ, मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, ग्रामविकास व आरोग्य विभागातील आयुर्वेदिक वैद्य, वैद्यकीय अधिकारी-वर्ग 3, अवैद्यकीय पर्यवेक्षक, युनानी हकीम, कृषी अधिकारी,  कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी श्रेणी-2, विस्तार अधिकारी श्रेणी-3, साथरोग वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य परिचर, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक (महिला), विस्तार अधिकारी (कृषी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक पशुधन विभाग अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता, जिल्हा सार्वजनिक परिचारिका, विस्तार अधिकारी (आयु.), प्रशिक्षित दाई, विकास सेवा गट-क, गट-ड, वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट क (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट ड (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गृह विभागातील पोलीस उपअधीक्षक, वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी, सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), मृद व जलसंधारण विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वित्त विभागातील सहाय्यक संचालक, कनिष्ठ लेखापाल या पदांची भरती केली जाणार आहे.
आरोग्य विभागातील 10 हजार 568, गृह विभागातील 7 हजार 111, ग्रामविकास विभागातील 11 हजार, कृषी विभागातील 2500, सार्वजनिक बांधकाम विभागातील 8 हजार 337, नगरविकास विभागातील 1500, जलसंपदा विभागातील 8 हजार 227, जलसंधारण विभागातील 2423, पशुसंवर्धन विभागातील 1047, मत्स्य व्यवसाय विभागातील 90 पदांची भरती केली जाणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: