Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ब्रिटिश दलाल मायकेलला पाच दिवस कोठडी
ऐक्य समूह
Thursday, December 06, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी 12 ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील 3600 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील संशयित आणि ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मायकेल याला मंगळवारी रात्री दुबईतून भारतात आणल्यानंतर त्याला आज पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तीं-साठी 12 ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी ब्रिटिश दलाला ख्रिस्तियन मायकेल याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ न्यायालयाने नोव्हेंबरमध्येच मोकळा केला होता. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मायकेलला दुबईतून विमानाने मंगळवारी रात्री 10.30 वाजता नवी दिल्लीत आणण्यात आले. तेथून त्याला सीबीआयच्य मुख्यालयात नेण्यात आले. मायकेला आज पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला सीबीआय कोठडी देण्यात आली. सीबीआयच्यावतीने विशेष सरकारी वकील डी. पी. सिंह यांनी बाजू मांडताना मायकेलच्या सीबीआय कोठडीची मागणी केली.
 ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. दुबईतील दोन खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मायकेलची चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद सिंह यांनी केला. मात्र, मायकेलला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती त्याच्या वकिलांनी केली. ही विनंती न्यायालयाने अमान्य केली. सीबीआय कोठडीत असताना सकाळी आणि संध्याकाळी एक तास मायकेलला भेटण्यास त्याच्या वकिलांना न्यायालयाने परवानगी दिली. मायकेलच्या वकिलांनी आज न्यायालयात जामीन अर्जही सादर केला. मात्र, हा अर्ज पुढील सुनावणीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मायकेलची अटक हे ऑगस्टावेस्टलँड प्रकरणातील मोठे यश मानले जात आहे. त्याच्या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती हाती लागू शकते. मायकेलला या व्यवहारात 225 कोटी रुपयांची दलाली मिळाली होती. तपासात तो काही बडी नावेही उघड करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, लाचेची रक्कम पचवण्यासाठी मायकेलने काही बनावट कंपन्यांची स्थापना भारतात आणि दुबईत केली होती, असा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) दावा आहे. त्या दृष्टीने ‘ईडी’चे अधिकारी लवकरच मायकेलची चौकशी करणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: