Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हिंदू राष्ट्र निर्मितीसाठीच दहशतवाद
ऐक्य समूह
Thursday, December 06, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: mn3
एटीएसचा दावा; नालासोपारा स्फोटक प्रकरणी आरोपपत्र
5मुंबई, दि. 5 (वृत्तसंस्था) : नालासोपारा अवैध शस्त्र व स्फोटक साठा प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगरकर यांच्यासह 12 आरोपींविरोधात तब्बल सहा हजार 842 पानांचे आरोपपत्र आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात दाखल केले. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने या तरुणांनी दहशतवादी टोळी बनवली, असा आरोप महाराष्ट्र एटीएसने केला आहे. या आरोपींवर भादंवि, स्फोटके कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपी सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि अशा प्रकारच्या अन्य संस्थांशी संबंधित आहेत. ‘क्षात्र धर्मसाधना’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ‘हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या’ उद्देशाने त्यांनी दहशतवादी तरुणांची टोळी बनवली, असे एटीएसने आरोपपत्रात नमूद केले आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून आणखी तीन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. या आरोपपत्रात शरद भाऊसाहेब कळसकर, वैभव सुभाष राऊत, सुधन्वा सुधीर गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, लीलाधर लोधी, वासुदेव सूर्यवंशी, सुजितकुमार, भारत कुरणे, अमोल काळे, अमित बड्डी, गणेश मिस्किन या आरोपींच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांवर भादंवि, स्फोटके कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथे 10 ऑगस्ट रोजी छापा टाकून अवैध शस्त्रास्त्रे व स्फोटकांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी सुरुवातीला वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना अटक करण्यात आली होती. सुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानशी तर वैभव राऊत हा सनातन संस्थेशी संबंधित आहे. शरद काळसकर हा नालासोपारा येथील तर सुधन्वा गोंधळेकर मूळचा सातारा येथील रहिवासी आहे. नालासोपार्‍यातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर काळसकर व गोंधळेकर यांना वसईतून अटक करण्यात आली होती.
ही टोळी देशाची एकता, सुरक्षा व सार्वभौमत्व यांना धोका पोहोचवण्याच्या उद्देशाने देशी बनावटीची शस्त्रे, गावठी बॉम्ब आदींचा वापर करून हिंदू धर्म, रूढी, प्रथा यांच्या विरोधात विडंबन, वक्तव्य आणि लिखाण करणार्‍या व्यक्ती व कार्यक्रमांना लक्ष्य करून लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याचा भाग म्हणून पाश्‍चात्य संस्कृतीचा पुरस्कार करणार्‍या ‘सनबर्न’ या पुणे येथील संगीत कार्यक्रमात डिसेंबर 2017 मध्ये घातपात करण्याचा आरोपींचा कट होता. या कार्यक्रमात गावठी बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब, अग्निशस्त्रांचा वापर आणि दगडफेक करून दहशत निर्माण करायची होती. त्यासाठी या कार्यक्रमाच्या स्थळाची आरोपींनी रेकी केली होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: