Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुलासमोर पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: mn1
महाबळेश्‍वर येथील लॉजमध्ये खळबळजनकघटना
5महाबळेश्‍वर, दि 6 : पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील अनिल सुभाष शिंदे, वय-34 याने पत्नी सीमा अनिल शिंदे, वय-30 हिचा गळा चिरून आणि पोटावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने स्वत: आपल्या पोटावर वार करून आत्महत्या केली. हा सर्व प्रकार अनिलचा 11 वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर घडला. या घटनेने महाबळेश्‍वरात एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी अनिल शिंदे, रा. वडार सोसायटी ऑफिस जवळ, विश्रांतवाडी, धानोरी-पुणे हा आपली पत्नी व मुलगा यांना बरोबर घेवून महाबळेश्‍वरला फिरायला आला होता. सुभाष चौकाजवळील एका लॉजमध्ये त्याने राहण्यासाठी 204 क्रमांकाची खोली घेतली. शहर व परिसरात थोडे फिरल्यानंतर रात्री जेवण करून ते आपल्या रूमवर आले. रात्री 1 च्या सुमारास एका महिलेच्या किंचाळण्याने परि-सरातील शांतात भंग पावली. हॉटेलमधील व्यवस्थापक आणि मालक हे महिलेच्या आवाजाच्या दिशेने धावले. रूममधील 11 वर्षाच्या मुलाने रूमचा दरवाजा उघडला आणि जे चित्र दिसले ते पाहताच दोघांच्या अंगाचा थरकाप उडाला. खोलीत दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मालकाने त्यांच्या 11 वर्षांचा मुलाला बरोबर घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी तातडीने पोलीस ठाणे आणि रुग्णवाहिका यांना फोन केला. घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड हे आपल्या सहकार्‍यांच्या बरोबर घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ रुग्णवाहिकाही तेथे आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना उचलून रुग्णवाहिकेत घालून त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी दोघेही मृत झाल्याचे पोलिसांना सांगितले.   
पोलिसांनी लॉजमधील खोलीची पाहणी करून तेथील सर्व साहित्य ताब्यात घेतले. अनिलचा मुलगा आदित्य याने पोलिसांना काही माहिती सांगितली. त्यानुसार रात्री 1 च्या दरम्यान दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणातूनच रागाने अनिलने आपल्या पत्नीचा गळा चिरला. पत्नीने आरडा ओरडा सुरू केला. तेव्हा आदित्य उठला आणि तो मध्ये पडला. आईला मारू नका, अशी विनवणी त्याने आपल्या पित्याला केली; परंतु अंगात राक्षस संचारलेल्या अनिलने मुलाचे काहीही ऐकले नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या पोटावर व पाठीवर तो धारदार शस्त्राने सपासप वार करीत होता. त्याचा राग इतका अनावर झाला होता, की या रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीवर सुमारे 25 पेक्षा अधिक ठिकाणी वार केले. वार करताना तो पूर्ण ताकतीचा वापर करीत असल्याने शस्त्राच्या मुठीवरून हात घसरून त्याची बोटेही जखमी झाली होती. पत्नी ठार झाल्याची खात्री पटताच त्याने त्याच शस्त्राने आपल्या पोटावर सपासप आठ ते नऊ वार करून त्यानेही आत्महत्या केली आणि तोही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. हा सर्व प्रकार 11 वर्षांचा निरागस आदित्य याच्यासमोर घडल्याने तो प्रचंड भेदरला होता. त्याला काहीच सुचत नव्हते. तो आपल्या आई जवळ जावून रडत होता. त्याचे हात व कपडेही रक्ताने माखले होते. अशातच कोणी तरी रूमचा दरवाजा वाजविल्याचा आवाज त्याने ऐकला आणि मग त्याने दरवाजा उघडला. दरवाज्यात हॉटेलचा मालक व व्यवस्थापक होते. रूममधील दृष्य बघून दोघांच्याही अंगाचा थरकाप उडाला होता. संपूर्ण खोली रक्ताने माखली होती. बेडवरील चादरीवर रक्ताचे डाग पडले होते. रूमच्या भिंतीवरही रक्त उडले होते. अनिलच्या जवळच रक्ताने माखलेला एक सुरा पडला होता. लॉजमधील व्यवस्थापकाने दोघांचे आधार, ओळखपत्र घेतले होते. त्यावरून दोघांची ओळख पटली. अनिलचा मुलगा आदित्य याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने आपला मामा अनिल पवार यांचा मोबाईल नंबर दिला. पोलिसांनी अनिल पवार यांचेशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली तसेच मुलाच्या घरीही कळविले. आज सकाळी दोघांचे नातेवाईक महाबळेश्‍वर येथे दाखल झाले. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड करत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी व ठसे तज्ञ फॉरेन्सिक लॅब तज्ञ यांनी घटनास्थळाची पाहणी करून, पंचनामा करून सर्व माहिती गोळा केली. यावेळी उप पोलीस निरीक्षक अनिल कोळी व त्यांचे सहकारी संतोष माळी व अमोल जाधव हे उपस्थित होते.
अनिल हा एका खाजगी कंपनीत चालक म्हणून काम करत होता. त्याला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. आदित्य हा धाकटा तर मुलगी थोरली आहे. मुलगी 13 वर्षांची असून दोघेही शाळेत शिकत आहेत. अनिल या पूर्वीही दोन ते तीन वेळा महाबळेश्‍वर येथे आपल्या कुटंबाबरोबर फिरायला आला होता. त्याला पर्यटनाची खूप आवड असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली
दोघांच्यात अलीकडे सारखी भांडणे होत होती. या भांडणातूनच अनिलने आपल्या पत्नीचा मोबाईल काढून घेतला होता. मोबाईल नसल्याने सीमाला आपल्या आईला फोनही करता येत नसे. जेव्हा अनिल कामावरून घरी येईल तेव्हाच अनिलच्या मोबाईलवरून ती नेहमी आपल्या आईशी संपर्क साधत होती. ती पुणे सोडून बाहेर जाताना नेहमी आपल्या आईला सांगूनच जात; परंतु यावेळी मात्र महाबळेश्‍वरला जाणार असल्याचे दोघांनीही कोणालाही सांगितले नाही.  पर्यटनाच्या नावाखाली महाबळेश्‍वर येथे यायचे व आत्महत्या करायची या घटनांची मालिका महाबळेश्‍वर येथे सुरू आहे. या पूर्वी किल्ले प्रतापगड, लिंगमळा धबधबा व ऑर्थरसीट येथे आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. या हंगामातील ही चौथी घटना आहे. या सर्व घटना ताज्या असतानाच आज पुन्हा येथे खून आणि आत्महत्या झाल्याचे उघडकीस आल्याने शहर व परिसरात एकच खळबळ माजली आहे. अशा वाढत्या घटनांमुळे महाबळेश्‍वरच्या निसर्ग सौंदर्याला डाग लागत असल्याची प्रतिक्रिया येथे व्यक्त केली जात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: