Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म्हसवड येथे उद्या श्री सिद्धनाथ-जोगेश्‍वरीचा रथोत्सव
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: re4
5म्हसवड, दि. 6 (विजय भागवत) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड, ता. माण येथील श्री सिद्धनाथ-जोगेश्‍वरीचा रथोत्सव शनिवार, दि. 8 रोजी होत आहे. या रथोत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटकातील लाखो भाविक दाखल होत आहेत. यात्रा सुरळीत होण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज असून यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिका व तालुका प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. यात्रेत मुबलक पाणीपुरवठा करण्यात येणार असून संपूर्ण हरात स्वच्छता ठेवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.
म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून चार ते पाच लाख भाविक येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व यात्रा सुरळीत होण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. शहरातील रस्ते, गटारे रोजच्या रोज साफ करण्यात येत आहेत. गटारांवर जंतूनाशक पावडर फवारणी, घराघरातून फॉगिंग मशिनवरुन कीटकनाशकांची फवारणी, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, रोगराई व साथरोग पसरू नयेत याची दक्षता घेण्यात येत आहे.
रथमार्गावरील स्वच्छता, अडथळ्यांची विल्हेवाट, काटेरी झुडुपे काढणे, खड्डे बुजवणे याची दक्षता घेण्यात आली आहे. सुमारे चारशे वर्षापासून रथ नदीपात्रातून जात असल्याची परंपरा आहे. आपत्कालीन परिस्थितीत अपवादाने रथमार्गात बदल केला जातो. मात्र, या वर्षी आपत्कालीन परिस्थिती नसल्याने रथ नदीपात्रातून जाणार आहे. या मार्गाने रथ गेल्याने कसलीही आपत्ती उद्भवणार नाही. यात्रेकरूंना नळावाटे पाणीपुरवठा, रथगृहाजवळ व आंबेडकरनगर पाणीपुरवठा टाकीजवळ स्टँड पोस्टद्वारे पाणीपुरवठा, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम व खाजगी टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी टीसीएल पावडर व तुरटी साठा आहे. नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक पाण्याच्या टाकीवर व विहिरींवर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यात्रा कालावधीत अखंडपणे वीज पुरवठा होण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कोल्हापूर, सोलापूर, सातारा, दहिवडी, म्हसवड येथील कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व विजेच्या खांबांवर बल्ब, ट्यूब बसवण्यात आल्या आहेत. रथ मिरवणुकीच्या वेळी जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रा काळात अखंड वीजपुरवठा होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. नगरपरिषदेचे अग्निशमन दल सज्ज आहे. यात्रेकरूंना प्राथमिक आरोग्य केंद्र व पालिकेकडून औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रेत हॉटेल, मिठाई दुकानातील पदार्थांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यात्रेकरूंसाठी स्वतंत्र दवाखाने उभारण्यात येणार आहेत.
यात्रेसाठी शहरात येणार्‍या वाहनांची खासबाग मळा, दहिवडी मळा, माळशिरस चौक, पोळ पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, भाटकी रोड, मार्केट यार्ड, पुळकोटी रस्ता, शिंगणापूर चौक या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यात्रा कालावधीमध्ये एस.टी. बसेसच्या फेर्‍या वाढवण्यासाठी प्रत्येक आगाराशी संपर्क साधण्यात आला आहे. यात्रा कालावधीत कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. टेहळणीसाठी टॉवर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली.
यात्रा सुरळीत होण्यासाठी नगराध्यक्ष तुषार वीरकर, उपनागराध्यक्षा सौ. स्नेहल सूर्यवंशी, नगरसेवक, डॉ. लक्ष्मण कोडलकर, सपोनि. मालोजीराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, नगरपालिकेचे अभियंता नितीन तिवाटणे, चैतन्य देशमाने, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यात्रेसाठी  उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीची तुकडी, पाच सपोनि., सात पोलीस उपनिरीक्षक व 140 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे सपोनि. देशमुख यांनी सांगितले. भाविकांना श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीचे दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी दर्शनबारी करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले.
या वर्षी प्रथमच पाळण्याच्या जागेसाठी लिलाव झाला. यामध्ये नऊ लाख रुपये देऊन एका पाळणा मालकाने जागा मिळवल्याने उत्सुकता वाढली आहे. यात्रेत विविध पाळणे, हॉटेल आली असून पेढे, जिलेबी व इतर खाद्यपदार्थ बनवण्याचे काम सुरू आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी रथाचे मानकरी राजेमाने कुटुंबीय, नगरपालिका, महसूल, पोलीस, आरोग्य, महावितरण, बांधकाम विभागाचे अधिकारी व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: