Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्रीय पथकाकडून माणच्या दुष्काळी गावांची पाहणी
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: re1
5वरकुटे-मलवडी, दि. 6 : केंद्रीय पथकाने माण तालुक्यातील दुष्काळी पूर्व भागातील शेनवडी, महाबळेश्‍वरवाडी, विरळी या गावांचा दौरा करून दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकाने या गावांमधील शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीचा अहवाल हे पथक केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय विभागाचे सहसंचालक एफसीडी (एक्सपेंडीचर) सुभाषचंद्र मीना यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या दौर्‍यात पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल, कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक दशरथ तांबोळी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, माणचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार बाई माने, जिल्हा अधीक्षक कृषी  सुनील बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, गटविकास अधिकारी गोरख शेलार, पोलीस उपअधीक्षक  अनिल वडनेरे, म्हसवडचे सपोनि. मालोजीराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक धनंजय बर्गे सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडीतून केंद्रीय पथक माण तालुक्यात दाखल झाले. या पथकाने शेनवडी (आळे वस्ती) येथील हरिदास शंकर खिलारी यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची पाहणी केली. गेल्या वर्षी किती उत्पन्न झाले होते, असे विचारले असता खिलारी यांनी गेल्या वर्षी सहा क्विंटल बाजरी झाल्याचे सांगितले. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने 0.60 हेक्टरवर केवळ 40 किलो बाजरी झाली. या बाजरीचे केवळ 800 रुपये मिळाले. मागच्या हंगामी पावसामुळे या वर्षी पेरलेली ज्वारी हिरवी दिसत असली तरी त्याला दाणे धरणार नाहीत. त्यामुळे त्यातून कसलेही उत्पन्न मिळणार नाही. ज्वारीच्या पेरणीसाठी 4,500 रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अन्य ग्रामस्थांशी संवाद साधून पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील पिण्याच्या पाण्याचा साठा पूर्ण संपल्याने लोकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी मिळत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. शेनवडी येथील पाहणीनंतर केंद्रीय पाहणी पथकाने महाबळेश्‍वरवाडी येथील इरिगेशन तलावाची पाहणी केली. या तलावातून वरकुटे-मलवडी, महाबळेश्‍वरवाडी, बनगरवाडी, शेनवडी, कुरणेवाडी या पाच गावांना पाणीपुरवठा होतो. हा तलाव यंदा पावसाअभावी कोरडा पडला असून महाबळेश्‍वरवाडीला रोज सोळा हजार लिटर पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जाते, असे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सांगितले तर हा तलाव 2013 पासून पूर्ण क्षमतेने भरला नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. महाबळेश्‍वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे, सुरेश घाडगे, जगन्नाथ जेडगे आदी शेतकर्‍यांनी व्यथा मांडल्या. टेंभू योजनेचे सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून या भागाला पाणी उपलब्ध करून द्यावे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न मार्गी लावावा. शेतकर्‍यांना आर्थिक विवंचनेतून मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी नागरिकांनी या पथकासमोर टाहो फोडला. त्यानंतर हे पथक विरळीला रवाना झाले. विरळी येथील शिवारातील धर्मू राणू लाडे यांच्या 0.40 हेक्टरवर असलेल्या डाळींब बागेची या पथकाने पाहणी केली. गेल्या वर्षी डाळिंबातून 1 लाख 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा जुलैमध्ये छाटणी केलेल्या या बागेतून काहीच उत्पादन मिळाले नाही. आता बाग वाळत असून ती वाचविण्यासाठी पाण्याची गरज असल्याचे लाडे यांनी सांगितले. श्‍वेता सिंघल, डॉ. कैलास शिंदे, सुनील बोरकर यांनी जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, चारा आणि पीक परिस्थितीची माहिती केंद्रीय पथकाला दिली. माण तालुक्याचा दौरा आटोपून केंद्रीय पथक पुणे जिल्ह्याकडे रवाना झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: