Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अ‍ॅॅसिड पाजून युवकाचा खून
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: re2
कराडमधील घटना; एकावर गुन्हा
5कराड, दि. 6 : येथील शिवाजी स्टेडियमशेजारच्या झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीवर वार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अजय सुनील गवळी या युवकास मारहाण करून अ‍ॅसिड पाजल्याने त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद अजयची बहीण व आई यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी रवींद्र सोनावले (रा. पाटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अजय गवळीची बहीण सौ. नीलम अमित बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शिवाजी स्टेडियमलगतच्या झोपडपट्टीत त्यांच्यासमोर राहणार्‍या एका महिलेच्या ओळखीच्या रवींद्र सोनावले (रा. पाटण) याने अजय गवळीची आई सुनीता यांना संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनचे काम करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड हजार रुपये घेतले होते. मात्र, काम न झाल्याने सुनीता गवळी यांनी सोनवलेकडे दीड हजार रुपये परत मागितले होते. त्यावरून सोनवलेने सुनीता गवळी यांना शिवीगाळ केली होती. दरम्यान, दि. 2 नोव्हेंबर रोजी अजय गवळी हा दिवाळीसाठी कराडला आला होता. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी तो कामानिमित्त वारुंजी फाट्यावर गेला होता. त्याच वेळी गवळी यांच्या शेजारी राहणार्‍या आणि सोनवले याच्या ओळखीच्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर वार झाल्याची घटना घडली होती.
ही घटना समजल्यावर नीलम बाबर या संबंधित मुलीला पाहायला गेल्या होत्या. मात्र, जखमी मुलीस दवाखान्यात नेण्यात आले होते. त्याच दिवशी संबंधित मुलीच्या आईने नीलम बाबर, त्यांची आई सुनीता व भाऊ अजय गवळी यांच्याविरोधात कराड पोलीस ठाण्यात मुलीच्या खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बाबर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. गुन्हा दाखल झाल्याचे अजयला समजले होते. या काळात अजयचे त्याच्या बहिणीशी दोन-तीन वेळा मोबाईलवरून बोलणेही झाले. त्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत अजयचा शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. त्याचा मोबाईल ‘स्विच ऑफ’ होता. दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता एक अ‍ॅम्ब्युलन्स बाबर यांच्या घराजवळ आली. त्यामध्ये अजय गवळी हा बेशुद्धावस्थेत होता. त्याला कृष्णा रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी त्याला सातारा येथे हलवण्यात आले. तेथून त्याला अधिक उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. अजयची प्रकृती ठीक नसल्याने पोलिसांना त्याचा जबाब नोंदवता आला नव्हता. अजय थोडा शुद्धीवर आल्यावर त्याने कागद व पेन मागून घेतला. रवींद्र सोनावलेने आपणास दमदाटी करून अ‍ॅसिड पाजल्याची चिठ्ठी त्याने लिहिली. त्यानंतर थोडे बोलता यायला लागल्यावर अजयने एका नातेवाइकाच्या मोबाईलवर स्वत:चा व्हिडिओ तयार केला. सोनवलेने अ‍ॅसिड पाजल्याचे त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले होते. काही दिवसांनी अजयची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यावर उपचार सुरू असताना दि. 29 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीवरून रवींद्र सोनावले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: