Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चैत्यभूमीवर उसळला जनसागर
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: mn2
महामानव डॉ. आंबेडकर यांना आदरांजली
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यभरातून आलेल्या लाखो अनुयायांनी चैत्यभूमीवर हजेरी लावून त्यांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन महामानवास अभिवादन केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरीनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो अनुयायी गुरुवारी मुंबईत आले होते. दादर येथील चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांनी   बाबासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर येणार्‍या लाखो अनुयायांसाठी पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विशेष व्यवस्था केली होती. बाहेरून आलेल्या लोकांसाठी शिवाजी पार्क मैदानात राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था पुरवण्यात आली होती. महापालिकेच्या सात शाळांमध्येही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि तालविहार संस्थेच्यावतीने ‘भीमांजली’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी आठच्या सुमारास चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, आ. राज पुरोहित, भाई गिरकर, कालिदास कोळंबकर, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त जगदीश पाटील, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारेच देश जगाच्या सर्वोच्च स्थानी पोहेचल, असा विश्‍वास व्यक्त केला. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व संविधानानुसार आम्ही काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व संविधानानेच भारत जगातील सर्वोत्तम देश बनू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. श्रीमती कमला मेहता अंधशाळा, दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत सरकारच्या अनास्थेबद्दल जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मारकाबाबतच्या सगळ्या गोष्टी आमच्या काळात झाल्या होत्या. स्मारकाचं काही पेपरवर्क राहिलं होतं, ते या सरकारने केलं आणि आता स्मारकाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. 2019 मध्ये आघाडी सरकार आल्यानंतर दीड वर्षांत स्मारकाचे काम पूर्णत्वाला नेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी चैत्यभूमीतील महामानवाच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे आणि मुंबई काँग्रेस सरचिटणीस महेंद्र साळवे, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसची ‘संविधान बचाव दिंडी’
काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सध्या सुरु आहे. आज महापरिनिर्वाण दिनी अमरावती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघर्ष यात्रेची सुरुवात झाली. संघर्ष यात्रा दर्यापूर शहरात पोहोचल्यानंतर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संविधानाची प्रत ठेवलेली पालखी खांद्यावर घेऊन बसस्थानक चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत ‘संविधान बचाओ’ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री वसंत पुरके, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर व काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: