Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कृषी निर्यात धोरणाला केंद्राची मंजुरी
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: na1
शेतकर्‍यांच्या दुप्पट उत्पन्नाची ‘वचनपूर्ती’?
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वचनपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज देशाच्या कृषी निर्यात धोरणाला मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन वारंवार दिले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. त्यात सर्वंकष कृषी निर्यात धोरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन पूर्ण होणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि व्यवसाय मंत्री सुरेश प्रभू यांनी या बैठकीतील निर्णयांची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय कृषी निर्यात धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे केंद्र सरकारने दिलेले वचन पूर्ण होणार आहे.
स्थिर व्यापाराच्या शासन धोरणामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतमालाच्या निर्यातीची संधी मिळणार असून त्याचा चांगला फायदाही होणार आहे. या धोरणामुळे सेंद्रिय आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. या धोरणामुळे विविध शेतमालाची निर्यात करणेही शक्य होणार आहे. शेतमालाच्या निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पैलूंवर या धोरणात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण, नियमांचे सुलभीकरण, संशोधन आणि विकासात्मक बाबींवर भर यांचा समावेश आहे. जागतिक कृषी व्यापारातील देशाचा हिस्सा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. चहा, कॉफी, भात यासारख्या शेतमालाची निर्यात वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. भारताची कृषी मालाची एकूण निर्यात 2022 पर्यंत दुप्पट म्हणजे 60 अब्ज अमेरिकन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: