Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

पुजाराच्या संयमी शतकाने लाज राखली
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: sp1
5अ‍ॅडलेड, दि. 6 (वृत्तसंस्था) :भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात चेतेश्‍वर पुजारानं खणखणीत 123 धावा ठोकल्या आहेत. त्याचे हे कसोटीतील 16 वे शतक असून पुजाराच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावा केल्या आहेत.
भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी करुन विकेट फेकल्यानंतर पुजाराच्या संयमी शतकाने भारताची थोडीफार लाज राखली.
अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सलामीची जोडी मैदानावर जास्त काळ टिकाव धरू शकली नाही. लोकेश राहुल अवघ्या दोन धाव करून तंबूत परतला तर मुरली विजयही 11 धावांवर बाद झाला. दोघांनी अवसानघातकी फटके मारले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेला कर्णधार विराट कोहलीदेखील अशाच विचित्र फटक्यावर बाद झाला. त्याने अवघ्या तीन धावा केल्या. त्याला मिशेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर आलेल्या चेतेश्‍वर पुजाराने सयंमी खेळीच प्रदर्शन घडवत शतकी खेळी केली. पुजाराने 7 चौकार आणि दोन षटकाराच्या सहाय्याने संयमी 123 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात 250 धावापर्यंत मजल मारता आली.  पुजाराला अजिंक्य रहाणेची थोडीच साथ मिळाली. या दोघांनी बराच वेळ किल्ला लढवत चौथ्या विकेटसाठी 22 धावा केल्या. पण ही जोडी दीर्घ काळ मैदानावर टिकू शकली नाही. जोश हेझलवूडच्या एका चेंडूवर रहाणे झेलबाद झाला. त्याने केवळ 13 धावा केल्या. तेव्हा भारताची स्थिती 4 बाद 41 अशी होती. त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने 37 धावांचे योगदान दिले. त्याने पुजाराला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिघाई रोहितला नडली. ऑफस्पिनर नॅथन लॉयनला षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्‍विन यांनी प्रत्येकी 25 धावा काढून पुजाराला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेदेखील फार वेळ टिकले नाहीत. शेवटी पुजाराने इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन कसोटीतील आपले 16 वे आणि ऑस्ट्रेलियातील पहिले शतक पूर्ण केले. पुजारा बाद झाल्यावर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: