Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मत्रेवाडीत दहा खण चौघई घरास शॉर्टसर्किटने आग : 12 लाख, 25 हजाराचे नुकसान
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: re3
5ढेबेवाडी, दि. 6 : मत्रेवाडी, ता पाटण येथे बुधवार, दि. 5 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका दहा खण चौघईच्या घरास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. या आगीत घरातील कपडालत्ता, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात सहा कुटुंबांचे एकूण 12 लाख 25 हजार रुपयांचे  नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या संकटाने मत्रेवाडीच्या सहा कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  मत्रेवाडी, ता. पाटण येथील लक्ष्मण रामचंद्र मत्रे, भगवान बापू मत्रे, ज्ञानदेव भगवान मत्रे, शामराव रामचंद्र मत्रे, सुरेश विठ्ठल मत्रे, संजय बाळकू मत्रे हे राहत असलेल्या घरास बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी दावणीला असणारे एक वासरू आगीमुळे दावण तोडून धावत सुटले ते दरवाजास येवून धडका मारू लागले. यामुळे लोक जागे झाले तर घराला आग लागून आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये आडेपाकडे जळून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. प्रसंगावधान साधून जनावरांना बाहेर काढण्यात गावकर्‍यांना यश आले असून यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. शेजारील घरांना धोका होवू नये व आग आटोक्यात यावी यासाठी गावातील लहान थोर सर्वजण प्रयत्न करत होते तसेच चार कूपनलिकांना पाइप जोडून, पाणी मारून व घरातील सर्व पाणी मारून गावकर्‍यांनी आग अटोक्यात आणली. पण यामध्ये वरील सहा कुटुंबांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग  शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. या जळीतचा पंचनामा गावकामगार तलाठी डी. जी. कोडापे व कोतवाल आर. टी. पुजारी यांनी केला. या कुटुंबांना तातडीची जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: