Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी
ऐक्य समूह
Tuesday, December 11, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: sp1
ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिकेत विजयाची ‘बोहनी’
5अ‍ॅडलेड, दि. 10 (वृत्तसंस्था) : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर पहिल्याच कसोटी सामन्यात चुरशीच्या लढतीत मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाने यजनामांचा 31 धावांनी पराभव करून 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियनभूमीत मालिकेतील पहिलीच कसोटी जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने तब्बल 70 वर्षांमध्ये प्रथमच केला आहे. या विजयाच्या निमित्ताने परदेशात जाऊन पराभूत होणारा संघ, ही प्रतिमा मोडीत काढण्याची संधीही टीम इंडियाला मिळाली आहे. या विजयाचा शिल्पकार असलेल्या चेतेश्‍वर पुजाराला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे.
अ‍ॅडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 250 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही भेदक मारा करत कांगारूंना पहिल्या डावात 235 धावांवर बाद केले होते. त्यामुळे भारताला 15 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसर्‍या डावात भारताने 307 धावा करत सामन्यात पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीची दमछाक झाली. मात्र, कांगारूंच्या शेपटाने भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान निर्माण केले. अखेर अश्‍विनने जोश हेझलवूडच्या रूपाने ऑस्ट्रेलियाचा  शेवटचा गडी बाद केला अन् टीम इंडियाने सलामीची कसोटी जिंकल्याचा जल्लोष केला.
पहिल्या डावात 3 बळी घेणार्‍या अश्‍विनने दुसर्‍या डावातही 3 बळी घेतले. जसप्रीत बूमराह आणि मोहम्मद शमी यांनीही प्रत्येकी 3 बळी घेत त्याला छान साथ दिली. इशांत शर्माने एक गडी बाद केला. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने मार्कस हॅरिस (26), उस्मान ख्वाजा (8), पीटर हँडस्कॉम्ब (14) यांना गमावले होते. पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. इशांत शर्माने भेदक बाऊन्सरवर ट्रेव्हिस हेडला (14) बाद केले. त्यानंतर शॉन मार्श आणि कर्णधार टीम पेन यांची जोडी जमली. ही जोडी फोडण्यात बूमराहला यश मिळाले. त्याने मार्शला 60 धावांवर बाद केले. मार्श-पेन जोडीने सहाव्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पेनही 41 धावांवर बाद झाला. मात्र, तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घामटा काढला. पॅट कमिन्स (28) व मिचेल स्टार्क (28) यांनी टिच्चून फलंदाजी केली तर नॅथन लॉयन (38) याने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ बाजी उलटवणार असे वाटत असतानाच टीम इंडियाने निर्धारपूर्वक खेळ करून विजय मिळवला.
टीम इंडियाचे विक्रम
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली आहे. विराट कोहली हा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. या आधी राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले होते. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये दोघांनाही अपयश आलं होतं. एका कॅलेंडर वर्षांमध्ये परदेशी खेळपट्ट्यांवर 3 कसोटी सामने जिंकण्याची भारतीय संघाची ही दुसरी वेळ ठरली. या आधी 1968 साली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या एकाच दौर्‍यात तीन कसोटी जिंकून पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. 2003 साली झालेल्या अ‍ॅडलेड कसोटीत राहुल द्रविडने द्विशतकी खेळी करून भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला होता. त्यानंतर 15 वर्षांनी चेतेश्‍वर पुजाराने याच मैदानावर पहिल्या डावात शतकी तर दुसर्‍या डावात अर्धशतकी खेळी करत सामनावीरचा किताब पटकावला. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकणारा भारत दुसरा आशियाई देश ठरला आहे. या आधी 1978-79 साली पाकिस्तान संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतने यष्टीमागे तब्बल 11 झेल घेत सर्वाधिक झेलांच्या विश्‍वविक्रमाची बरोबरी केली. मात्र, बूमराहच्या गोलंदाजीवर पंतने लायनचा झेल सोडून विश्‍वविक्रम करण्याची संधी गमावली. ऋषभ पंतने या कामगिरीसह इंग्लंडचा जॅक रसेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रसेल व डीव्हिलियर्स यांनी अनुक्रमे 1995 आणि 2013 मध्ये एकाच कसोटीत यष्टीमागे अकरा झेल घेतले होते. पंतने या विक्रमाची बरोबरी करताना अ‍ॅडलेडवर पहिल्या डावात सहा तर दुसर्‍या डावात पाच झेल टिपले. भारतीय यष्टीरक्षकांमध्ये यापूर्वी 10 झेल घेत साहा प्रथम तर 9 झेलांसह धोनी दुसर्‍या स्थानावर होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: