Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

ऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी
ऐक्य समूह
Monday, December 17, 2018 AT 11:42 AM (IST)
Tags: sp1
दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 4 बाद 132

5पर्थ, दि. 16 (वृत्तसंस्था) : भारताविरूद्ध सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 4 बाद 132 धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजाच्या नाबाद 41 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 175 धावांची आघाडी घेतली आहे. त्यापूर्वी भारताचा डाव 283 धावांत संपुष्टात आला. कर्णधार विराट कोहलीने 123 धावांची झुंजार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लॉयनने 5 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावाची सुरुवात अतिशय संथ झाली. फिंचने 30 चेंडूत 25 धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला व तंबूत परतला. त्याच वेळी चहापानाची विश्रांती घेण्यात आली. अखेरच्या सत्रात बुमराहच्या चेंडूवर हॅरीस 20 धावांवर बाद झाला. पहिल्या डावात अर्धशतकाने हुलकावणी दिलेला शॉन मार्श (45) दुसर्‍या डावात झेलबाद झाला. शमीने त्याला 5 धावांवर बाद केले. हँड्सकॉम्बही 13 धावांवर पायचीत झाला. तर पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी तंबूत परतला. हेडने केवळ 19 धावा केल्या. डाव संपला तेव्हा ख्वाजा 41 आणि पेन 8 धावांवर खेळत आहेत. नॅथन लॉयनने घेतलेल्या 5 बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर विहारी (20), कोहली (123) आणि शमी (0) झटपट बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ झुंज दिली पण तो देखील 36 धावांवर माघारी परतला. अखेर बुमराहला माघारी पाठवत लॉयनने भारताचा डाव संपवला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: