Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

फिरकीपटूच्या कमतरतेमुळे टीम इंडियाचा पराभव : विराट कोहली
ऐक्य समूह
Wednesday, December 19, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: sp2
5पर्थ, दि. 18 (वृत्तसंस्था) : ’आमच्याकडे चार जलदगती गोलंदाज होते. त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेण्याचे आमचे डावपेच होते, म्हणूनच आम्ही फिरकीपटू रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्याचा विचार केला नाही, असे सांगत कर्णधार विराट कोहलीने फिरकीपटूच्या कमतरतेमुळेच भारताला दुसरी कसोटी गमवावी लागल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
पर्थ येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताचा 146 धावांनी पराभव झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. कसोटी मालिकेनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराट कोहलीने संघातील फिरकीपटूच्या कमतरतेकडे लक्ष वेधतानाच ऑस्ट्रेलियाच्या संघाचेही कौतुक केले. दुसर्‍या कसोटीत आम्ही काही प्रमाणात चांगला खेळ केला तर काही चुका केल्या. पुढच्या कसोटी सामन्यात चुका टाळण्यावर आमचा भर असेल. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
जिंकण्यासाठीचे लक्ष्य आणखी 30 ते 40 धावांनी कमी असते तर चांगले झाले असते, असे सांगतानाच ऑस्ट्रेलियाच्या टीमने चांगली कामगिरी करून मोठी धावसंख्या उभारली तर भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. विशेष करून दुसर्‍या डावात भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झाल्याचे त्याने सांगितले.
या खेळपट्टीवर जडेजाला संधी द्यायला हवी होती का, असा सवाल त्याला करण्यात आला असता खेळपट्टी बघितल्यावर तसे वाटले नाही. पहिल्यांदा खेळपट्टी पाहिली तेव्हा वेगवान गोलंदाज पुरेसे होतील, असे आम्हाला वाटले. पण याच खेळपट्टीवर नॅथन लॉयनने चांगली गोलंदाजी केल्याचेही त्याने सांगितले. भुवनेश्‍वर कुमारने जास्त कसोटी सामने खेळले नाहीत म्हणून कसोटीसाठी त्याचा विचार करण्यात आला नव्हता. उमेश यादवने गेल्या कसोटी सामन्यात दहा बळी घेतले होते. त्याची कामगिरी चांगली होती म्हणून त्याची निवड करण्यात आली. जर अश्‍विन फिट असता तर आम्ही त्याच्या नावाचाही विचार केला असता. प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्ही फिरकीपटूच्या बाबतीत विचारच केला नव्हता. मात्र पुढच्या सामन्यात फिरकीपटूचा नक्कीच विचार केला जाईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: