Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

तिसर्‍या कसोटीवर भारताचा वरचष्मा
ऐक्य समूह
Friday, December 28, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: sp1
चेतेश्‍वर पुजाराचा शतकी धडाका कायम
5मेलबर्न, दि. 27 (वृत्तसंस्था) : अनुभवी चेतेश्‍वर पुजारा (106), कर्णधार विराट कोहली (82) आणि रोहित शर्मा (नाबाद 63) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर भारताने तिसर्‍या कसोटीवर पकड मिळवली आहे. भारताने दुसर्‍या दिवशी 7 बाद 443 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सावध फलंदाजी करत बिनबाद 8 धावा केल्या. पुजाराने या मालिकेतील दुसरे शतक ठोकताना तब्बल 319 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने 3, स्टार्कने 2 तर हेजलवूड व लॉयनने प्रत्येकी बळी टिपला.
दुसर्‍या दिवशी भारताचा अनुभवी खेळाडू चेतेेश्‍वर पुजारा (106) आणि कर्णधार विराट कोहली (82) यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने एकही गडी न गमावता 2 बाद 277 धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहली आणि पुजारा बाद झाल्यानंतर मुंबईकर रहाणे-रोहित जोडीने मोर्चा सांभाळला. रहाणे (34) बाद झाल्यानंतर रोहितने पंतच्या साथीने धावसंख्या 400 पार पोहचवली. अखेर पंत 39 धावांवर बाद झाला. पंतनंतर खेळपट्टीवर आलेला रवींद्र जडेजाही लगेच माघारी परतला. कसोटी संघात पुनरागमन करणार्‍या मुंबईकर रोहित शर्माने (नाबाद 63) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले. जडेजा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करून कांगारूंना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. दुसर्‍या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 8 धावा केल्या. दरम्यान, पहिल्या दिवसअखेर नवोदित मयंक अग्रवाल (76) आणि पुजारा यांच्या खेळीच्या बळावर भारताने 2 बाद 215 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याच धावसंख्येवरून भारताने डावाला सुरुवात केली. कर्णधार कोहलीने पहिल्याच षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले तर उपहाराला काही कालावधी शिल्लक असताना पुजाराने शतक झळकावले. हे त्याचे मालिकेतील दुसरे शतक ठरले.
विराटने मोडला द्रविडचा विक्रम
दरम्यान, विराट कोहलीने मेलबर्न कसोटीत 82 धावा करून राहुल द्रविडचा 6 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. विराटने परदेशात एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या वर्षात विराटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 1138 धावा केल्या आहेत.
‘द वॉल’ राहुल द्रविडने एका वर्षात परदेशी भूमीवर 2002 मध्ये 1137 धावा केल्या होत्या तर विराटने 11 कसोटी सामन्यांमधील 21 डावांत 1138 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडपेक्षा विराटने अवघी एकच धाव अधिक केली असली तरी त्याला आणखी एका डावात फलंदाजी करण्याची संधी आहे. राहुल द्रविडने 2002 मध्ये सर्वाधिक धावा करताना 19 वर्षे जुना मोहिंदर अमरनाथ यांचा विक्रम मोडला होता. मोहिंदर अमरनाथ यांनी 1983 मध्ये 1065 धावा केल्या होत्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: