Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईत कपात
ऐक्य समूह
Friday, January 04, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्यानंतर दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 2000 रुपयांच्या चलनी नोटांची छपाई आता कमी करण्यात आली आहे.
कर चुकवेगिरी, पैशांची अफरातफर, काळा पैसा रोखण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेणार्‍या केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. मात्र, या दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर कर चुकवेगिरी, पैशांची अफरातफर आणि काळा पैसा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होत असल्यानेच या नोटांची छपाई कमी करण्याचा  निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.  मात्र, दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या, त्याच वेळी या नोटांची छपाई हळूहळू कमी करण्याचे ठरवण्यात आले होते. चलनी नोटांच्या छपाईबाबत केंद्र सरकार व आरबीआय वेळोवेळी निर्णय घेत असते, असे आरबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेली नोटांची टंचाई विचारात घेऊन दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पूर्वी चलनात असलेल्या एकूण नोटांच्या तुलनेत पाचशे व हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण तब्बल 86 टक्के होते. त्या तुलनेत नोटाबंदीनंतर चलनात आणलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण एकूण नोटांच्या तुलनेत मार्च 2017 अखेर 50 टक्के होते. ते आता मार्च 2018 नंतर 37.3 टक्के झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: