Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारताची ऐतिहासिक मालिका विजयाकडे वाटचाल
ऐक्य समूह
Saturday, January 05, 2019 AT 11:53 AM (IST)
Tags: sp1
पुजाराचे द्विशतक हुकले; ऋषभ पंतचे विक्रमी शतक
5सिडनी, दि. 4 (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या व मालिकेतील शेवटच्या कसोटीवर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. चेतेश्‍वर पुजारा (193) आणि ऋषभ पंत (नाबाद 159) यांच्या दीडशतकी खेळ्या आणि रवींद्र जडेजाच्या 81 धावांच्या जोरावर भारताने ही मजल मारली. दुसर्‍या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 598 धावांनी पिछाडीवर आहे. यजमानांनी बिनबाद 24 धावा केल्या होत्या.
भारताने ऑस्ट्रेलियात 71 वर्षात एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र, या चार कसोटींच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतही भारताने पहिल्या डावात 622 धावांचा डोंगर उभारला आहे. सामन्याचा तीन दिवसांचा खेळ शिल्लक असून मालिका बरोबरीत सोडवणे कांगारुंसाठी अशक्यप्राय आहे. त्यामुळे ही कसोटी भारत जिंकू शकतो किंवा अनिर्णित राहू शकते.
दरम्यान, पहिल्या दिवसअखेर 4 बाद 303 अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. त्यापुढे आज खेळाला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात नॅथन लॉयनने हनुमा विहारीचा बळी टिपला. त्याने 42 धावा केल्या. मात्र, चेतेश्‍वर पुजाराची मॅरेथॉन खेळी सुरुच राहिली. दुर्दैवाने पुजाराला द्विशतकाने हुलकावणी दिली. तो 193 धावांवर बाद झाला. मात्र, ऋषभ पंतने नाबाद 159 धावा तडकावल्या. जडेजा 82 धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव घोषित करण्यात आला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी विक्रमी 207 धावांची भागीदारी केली.
ऋषभ पंतची विक्रमाला गवसणी
या कसोटीत ऋषभ पंतने शतक झळकावून एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियान भूमीत कसोटी शतक ठोकणारा ऋषभ हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. कसोटी कारकिर्दीतील ऋषभचे हे दुसरे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले शतक आहे. या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनियर यांच्या नावावर होता. त्यांनी 1967 साली अ‍ॅडलेड कसोटीत 89 धावा केल्या होत्या. ऋषभने या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा 12 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. सिडनी कसोटीत 159 धावा करणारा ऋषभ भारताबाहेर सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी धोनीने 2006 साली फैसलाबाद कसोटीत पाकिस्तानच्या विरुद्ध 148 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक ठोकणारा पंत हा दुसरा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. तो 21 वर्षांचा आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वयाच्या 18 व्या वर्षी ऑस्ट्रेलियात दोन शतके ठोकली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: