Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

विराट सेनेची ऐतिहासिक कामगिरी
ऐक्य समूह
Tuesday, January 08, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: sp1
ऑस्ट्रेलियात भारताचा पहिला कसोटी मालिका विजय
5सिडनी, दि. 7 (वृत्तसंस्था) : भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ज्या ऐतिहासिक कामगिरीची प्रतीक्षा करत होता, तो अविस्मरणीय दिवस अखेर सोमवारी उजाडला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय सेनेने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सिडनीत अनिर्णित राहिल्याने भारताने 2-1 अशा फरकाने कसोटी मालिकेत सरशी साधली. सिडनी कसोटीत चौथ्या दिवशीचे सुरुवातीचे सत्र आणि अखेरच्या संपूर्ण दिवसाचा खेळ अंधुक प्रकाश आणि पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे मालिका 3-1 अशा फरकाने जिंकण्याची भारताची संधी हिरावून घेतली. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिल्यावर भारताला डावाच्या विजयाची संधी होती. मात्र, दोन्ही पंचांनी खेळपट्टीची पाहणी करुन दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना अनिर्णित घोषित केला. चेतेश्‍वर पुजाराला सामनावीर आणि  मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर आटोपल्यामुळे त्यांच्यावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. तिसर्‍या दिवशी कांगारूंचा पहिला डाव सुरू झाला. सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने सावध सुरुवात करत संघाला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर उस्मान ख्वाजा (27) बाद झाला. दुसर्‍या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला हॅरिसदेखील बाद झाला. त्याने 79 धावा केल्या. पाठोपाठ शॉन मार्श 8 धावांवर बाद झाला. चांगली सुरूवात केल्यानंतर लबुशॅन 38 धावा करून माघारी परतला. ट्रेव्हिस हेडही 20 धावा करून बाद झाला. तिसर्‍या सत्रात पहिल्याच षटकात कर्णधार टीम पेन (5) तंबूत परतला. चौथ्या दिवशी पहिले सत्र वाया गेले. दुसर्‍या सत्रापासून खेळ सुरू झाल्यावर यजमानांनी तीन गडी झटपट गमावले. कमिन्स (25), हँड्सकॉम्ब (37) आणि लॉयन (0) हे पाठोपाठ बाद झाले. शेवटच्या जोडीने चांगली झुंज दिली; पण कुलदीपने ती जोडी फोडत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 वर संपवला. कुलदीपने 5, जडेजा आणि शमीने प्रत्येकी 2 तर बूमराहने 1 बळी टिपला. पहिल्या डावात भारताने 322 धावांची आघाडी घेतली होती. फॉलोऑन दिल्यावर कांगारूंनी बिनबाद 6 अशी मजल मारल्यानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता. पाचव्या व शेवटच्या दिवसाचा संपूर्ण खेळही अंधुक प्रकाश आणि पावसामुळे वाया गेला. या मालिकेत चेतेश्‍वर पुजारा (मालिकेत 521 धावा), ऋषभ पंत (350 धावा), कर्णधार विराट कोहली (282) धावा, जसप्रीत बूमराह (मालिकेत 21 बळी), मोहम्मद शमी (16 बळी), इशांत शर्मा (11 बळी) हे भारताच्या कसोटी विजयाचे
प्रमुख शिल्पकार ठरले. कुलदीप यादवने शेवटच्या कसोटीत कांगारूंच्या पहिल्या डावात पाच बळी घेऊन आपली निवड सार्थ ठरवली. ऋषभ पंतनने एकाच कसोटीत 11 पेक्षा अधिक झेल घेण्याचा विक्रमही केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: