Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या प्रकरणी पाच सदस्यीय घटनापीठ गठीत
ऐक्य समूह
Wednesday, January 09, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: na1
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारपासून नियमित सुनावणी
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय घटनापीठ गठीत केले आहे. या घटनापीठासमोर गुरुवार, दि. 10 पासून नियमित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही. रमण, न्या. उदय उमेश लळीत व न्या. धनंजय वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील 2.77 एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा व राम लल्ला यांना सारख्या प्रमाणात वाटून देण्याचा निकाल 2010 मध्ये दिला होता. त्यावर 14 अपिले प्रलंबित आहेत. एकूण चार दिवाणी दाव्यांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जमीन सारखी वाटण्याचा निकाल दिला होता. गेल्या 29 ऑक्टोबरला न्यायालयाने रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावर योग्य पीठामार्फत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी केली जाईल असे जाहीर केले होते. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी करणारा अर्ज हिंदू महासभेने केला होता.
अयोध्येतील 2.77 एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा व राम लल्ला यांना समप्रमाणात वाटून देण्याचा सत्र न्यायालयाचा  निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये कायम केला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 14 अपिले दाखल करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी 29 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत प्रलंबित अपिलांची पुढील सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर व्हावी, अशी विनंती मुस्लीम पक्षकारांनी केली होती. मात्र, तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण व न्या. अब्दुल नझीर यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने ही मागणी फेटाळली होती. या प्रकरणाचा निर्णय घेण्यास त्रिसदस्यीय खंडपीठ सक्षम आहे, असा निर्णय खंडपीठाने 2:1 अशा बहुमताने दिला होता. न्या. नझीर यांनी ही सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्याच्या बाजूने निकाल दिला होता.
त्यानंतर 29 ऑक्टोबरला न्यायालयाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादावर योग्य पीठामार्फत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर या प्रकरणी 4 जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी पुढील आदेश योग्य ते पीठ 10 जानेवारी रोजी जारी करेल, असे न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले होते. मात्र, आता पाच सदस्यीय घटनापीठ गठीत करुन 10 जानेवारीपासून नियमित सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केले आहे.
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडत चालल्याने केंद्र सरकारने राम मंदिर उभारणीसाठी तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी लावून धरली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्या प्रकरणी अध्यादेश काढण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत नुकतेच स्पष्ट केले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: