Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाबळेश्‍वरमध्ये गौण खनिज वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले
ऐक्य समूह
Thursday, January 10, 2019 AT 11:44 AM (IST)
Tags: re1
तहसीलदारांची मध्यरात्री कारवाई, 5 लाख 65 हजारांचा दंड
5महाबळेश्‍वर, दि. 9 : गौणखनिज वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गौण खनिजची वाहतूक करणारे पाच ट्रक मध्यरात्री 1 ते दीडच्या सुमारास येथील तहसीलदार मीनल कळसकर यांनी सापळा लावून पकडले. शिवाय त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी या पाच ट्रक मालकांना पाच लाख 65 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एका महिला तहसीलदारांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे तालुक्यात कौतुक होत आहे.
महाबळेश्‍वरच्या तहसीलदार मीनल कळसकर या मंगळवारी वाई येथे शासकीय बैठकीसाठी गेल्या होत्या. तेथून रात्री परतत असताना त्यांना खबर मिळाली, की चिपळूण येथून नऊ ट्रक दगड भरून महाबळेश्‍वरमार्गे पुढे जाणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी एक लिपिक व एक शिपाई असे दोन कर्मचारी बोलावून घेतले. मध्यरात्री बारा वाजता महाड नाका येथे पोलिसांच्या मदतीने सापळा लावला. दीडच्या सुमारास एका मागून एक ट्रक येवू लागले. साधारण अर्ध्या एक तासात पाच ट्रक आले तसे ते पकडण्यात आले. पाच ट्रक पकडण्यात आल्याची खबर घाटात असलेल्या चार ट्रक चालकांना मिळाली. त्यांनी ते ट्रक घाटात असलेल्या एका ढाब्यावर थांबविले व तेथेच थांबणे पसंत केले. 9 पैकी पाच ट्रक सापळ्यात अलगद सापडले. हे सर्व ट्रक तहसील कार्यालयाबाहेर उभे करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने पुढील कारवाई करण्यात आली.   
गौण खनिजची वाहतूक सूर्योदय ते सूर्यास्त याच वेळेत करायची असते. याबाबत कठोर नियमावली आहे. परंतु महसूल विभागाचे प्रशासन गृहीत धरून नियम डावलून गौण खनिजची वाहतूक केली जाते. याबाबत तहसीलदार मीनल कळसकर यांना माहिती मिळताच त्यांनी मोजक्या कर्मचार्‍यांच्या मदतीने या ट्रकवर धाडसी करवाई करून पाच लाख 65 हजार रुपये दंड ठोठावला. यामध्ये विलास मोरे, योगेश साळुंखे, गणेश भिलारे यांना 1 लाख 10 हजार 800 रुपये तर विजय कासुर्डे यांचे दोन ट्रक व आरीफ शारवान यांचा एक असे प्रत्येकी 1 लाख 16 हजार 200 असा दंड करण्यात आला आहे.  दंडाची ही सर्व रक्कम 5 लाख 65 हजार रुपये होते.
रात्री अपरात्री अंधाराचा फायदा घेवून आजही वाळू वाहतूक होत असते. दगड या गौण खनिजची मोठ्या प्रमाणावर येथे वाहतूक होत असते. मात्र महाबळेश्‍वरच्या तहसीलदारपदाची सूत्रे हाती
घेतल्यानंतर मीनल कळसकर यांनी अशा प्रकारे होणारी विना परवाना व नियम धाब्यावर बसवून केली जाणारी वाहतूक यावर लक्ष केंद्रित केले आहे. आजपर्यंत त्यांनी 12 ट्रक पकडून, लाखो रुपये दंड आकारून शासनाच्या तिजोरीत महसूल जमा केला आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारे वाहतूक करणारांचे कंबरडेच मोडले आहे. या पुढील काळात अशा प्रकारे चोरट्या वाहतुकीला आळा बसेल, अशी चर्चा
तालुक्यात सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: