Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, गोडोली, सातारा यांच्याकडून 10 लाखांची देणगी
ऐक्य समूह
Friday, January 11, 2019 AT 11:40 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 10 : गोडोली, ता. सातारा येथील श्री भैरवनाथ, महादेव, नृसिंह व गणपती देवस्थान ट्रस्ट गोडोली यांच्याकडून सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या संत दामाजी अंध व अपंग संस्था, मंगळवेढा, श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा, कृष्णामाई ग्रामविकास संस्था, क्षेत्रमाहुली, एकता ग्रामविकास संस्था, भोसरे, ता. खटाव, सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था, सातारा, पुसेसावळी भाग शिक्षण प्रसारक मंडळ, ता. खटाव, जय हनुमान सांस्कृतिक क्रीडा प्रतिष्ठान, गोडोली, आकार ग्रामीण विकास संस्था, पर्वत तर्फे वाघावळे, ता. महाबळेश्‍वर अशा विविध सामाजिक संस्थांना रक्कम रुपये 10 लाखांची आर्थिक मदत देऊन त्यांना कार्य करण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आर्थिक देणगी देऊन त्यांच्या कार्यास नुकत्याच शुभेच्छा देण्यात आल्या.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त आय. के. सूर्यवंशी यांच्या हस्ते वरील सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सूर्यवंशी यांनी देवस्थान ट्रस्टकडे येणार्‍या निधीचा चांगला बदल घडवून येण्यासाठी व समाजातील तळागाळातील लोकांनाही सामाजिक, वैचारिक व शैक्षणिक बदल घडवून आणण्यासाठी देवस्थान ट्रस्टने विविध उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. शाश्‍वत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी भैरवनाथ ट्रस्टने दिलेल्या मदतीबद्दल आभार मानले. मृत व्यक्तींचे डोळे जरी दान केले तर भारतात एकही अंध व्यक्ती राहणार नाही, अशी त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत संकपाळ यांनी ट्रस्ट राबवत असलेले विविध उपक्रम तसेच ग्रामदैवत भैरवनाथाचे पुराण शैलीतील हेमाडपंथी काळ्या पाषाणात अत्यंत सुबक मंदिराचे काम सुरू असल्याचे विषद करून ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती दिली.
ट्रस्टचे सचिव व्यंकटराव मोरे यांनी ट्रस्टने राबविलेले सामाजिक उपक्रम; यामध्ये गुणवंत विद्यार्थी, खेळाडू यांना तसेच सातारा शहरातील मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी राबविण्यात येणार्‍या उपक्रमांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाला संस्थांचे पदाधिकारी, मुकुंद प्रभुणे, खोत, संजय कांबळे, भाऊसाहेब जाधव, श्री. येवले व भैरवनाथ ट्रस्टचे खजिनदार सुनील मोरे, विश्‍वस्त लक्ष्मण मोरे, अशोक मोरे, राजू घुले, पोपट मोरे, बाळासाहेब मोरे, प्रशांत जगताप व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: