Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सीबीआय संचालक आलोक वर्मांची उचलबांगडी
ऐक्य समूह
Friday, January 11, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: na1
उच्चाधिकार निवड समितीचा बहुमताने निर्णय
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने आलोककुमार वर्मा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी पुनर्स्थापना करुन दोन दिवस उलटत नाहीत तोच त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार निवड समितीने गुरुवारी हा निर्णय घेतला. वर्मा यांची केंद्रीय अग्निसुरक्षा विभागात महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आलोक वर्मा हे 1979 च्या बॅचचे ‘एजीएमयूटी’ (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि अंदमान-निकोबार वगळून इतर केंद्रशासित प्रदेश) केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर, या दोन आरोपांवरून त्यांची सीबीआय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई झालेले ते सीबीआयचे पहिलेच संचालक आहेत. हा निर्णय घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. के. सिक्री यांचा समावेश होता. वर्मा यांना हटवण्याचा निर्णय दोन विरुद्ध एका मताने घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरगे यांनी वर्मा यांना हटवण्यास विरोध केला. आपली असहमती असल्याचे पत्र त्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते. मात्र, या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्या. सिक्री ठाम राहिले. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन राळ उडवून दिली होती. त्यामुळे देशाच्या या सर्वोच्च तपास संस्थेची बदनामी झाल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करुन वर्मा व अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.      
त्याला वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने मोदी सरकारचा निर्णय रद्दबालत ठरवताना त्यांची या पदावर पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय मंगळवारी दिला होता. सीबीआय संचालकांना हटवण्याचा किंवा बदली करण्याचा निर्णय त्यांची निवड करणार्‍या उच्चाधिकार निवड समितीलाच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, वर्मा यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करुन त्यांच्या भवितव्याविषयी निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समितीने एक आठवड्याच्या आत बैठक बोलवावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या निवड समितीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले प्रतिनिधी म्हणून न्या. सिक्री यांची नियुक्ती केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री निवड समितीची पहिली बैठक झाली होती. त्यात कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. त्यानंतर आज झालेल्या दुसर्‍या बैठकीत वर्मा यांना सीबीआय प्रमुखपदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. सीबीआच्या संचालकपदी नव्या अधिकार्‍याची निवड होईपर्यंत एम. नागेश्‍वर राव यांच्यावर संचालकपदाची हंगामी जबाबदारी सोपवण्यात येईल, असे समजते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: