Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिबट्याच्या पिल्लास जीवदान
ऐक्य समूह
Friday, January 11, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: re1
5उंब्रज, दि. 10 : खालकरवाडी, ता. कराड गावच्या हद्दीतील विहिरीत पडलेल्या एक वर्ष वयाचा बिबट्याच्या पिल्लास सुरक्षित बाहेर काढण्यास वनविभागाच्या अधिकार्‍यांना यश आले. दरम्यान तब्बल साडेपाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या पिंजर्‍यात सुरक्षित जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खालकरवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत पट्टी नावाच्या हद्दीतील शिवारात संजय तुकाराम शिंदे यांच्या विहिरीत गावातील पांडुरंग शिवाजी गाडे हे पाणी पाजण्यासाठी शेतात गेले होते.
यावेळी पांडुरंग गाडे हे मोटर सुरू करण्यापूर्वी विहिरीत पाणी किती आहे, हे पाहण्यासाठी विहिरीत डोकावले असता त्यांना फुटबॉलच्या पाइपला बिबट्या घट्ट धरून बसल्याचे दिसले. विहिरीत बिबट्या असल्याचे गाडे यांनी पाहिले असता त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. त्यांनी तत्काळ सरपंच अमर माने यांच्याशी संपर्क साधून बिबट्याची माहिती दिली. माने यांनी टोल फ्री नंबर वरून वनविभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला.    
घटनेची माहिती खालकरवाडीसह परिसरातील नागरिकांना समजताच नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. तदनंतर काही वेळात कराडचे वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वराडे वनपाल रमेश कुंभार, एस. जी. सुतार, वनरक्षक भारत खटावकर, अशोक मलप, सुजित गवते, सागर कुंभार, तानाजी मोहिते, प्रशांत मोहिते, बाबूराव कदम, योगेश पाटील, संदीप कुंभार, विलास वाघमारे, रामदास घावटे, दादाराव बर्गे, जाधव, सौरभ लाड, शंभूराज माने, मोहन भांडलेकर, दिनकर इंगळे, वन कर्मचारी, ग्रामस्थ हे घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन त्यांनी रेस्की ऑपरेशन करण्यास सुरवात केली. त्यांनी तातडीने दोरीच्या सहाय्याने लोखंडी कॉट पाण्यामध्ये सोडली. त्यावेळी पाण्यात पडलेल्या बिबट्याने कॉटचा अंदाज घेत त्यावर विसावा घेतला. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वनविभागाने मागविण्यात आलेला पिंजरा विहिरीच्या काठावर दाखल होताच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पिंजरा रस्सीच्या सहय्याने विहिरीत सोडण्यात आला आणि कॉटवर विसावलेल्या बिबट्याने पिंजर्‍यात उडी मारतात पिंजर्‍याचे दार लावल्याने बिबट्या अलगदपणे पिंजर्‍यात जेरबंद झाला. वनविभागासह,पोलीस, नागरिक यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: