Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

एकदिवसीय मालिकेतही ऐतिहासिक विजय
ऐक्य समूह
Saturday, January 19, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: sp1
5मेलबर्न, दि. 18 (वृत्तसंस्था) :  युजवेंद्र चहलचे सहा बळी, आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असूनही पुन्हा मागील सोनेरी दिवसांची आठवण करून देणार्‍या महेंद्रसिंग धोनीची नाबाद 87 धावांची जबरदस्त खेळी आणि केदार जाधवचे नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मेलबर्न येथील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला सात गडी राखून धूळ चारली. या विजयाने भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याचा  ऐतिहासिक पराक्रम केला. दोन्ही निर्णायक सामन्यांमध्ये भारतीय संघाला अंतिम रेषेपर्यंत पोहोचवणार्‍या महेंद्रसिंग धोनीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. या विजयात कर्णधार कोहलीनेही 46 धावा करून मोलाचे योगदान दिले. मेलबर्नची खेळपट्टी इतकी संथ होत गेली, की फलंदाजांना फटकेबाजी करणे कठीण होते. विशेष म्हणजे या सामन्यात एकाही षटकाराची नोंद झाली नाही.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20   पान 1 वरून
या तिन्ही प्रकारांमध्ये अपराजित राहणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमानांना 2-1 ने धूळ चारली. आता एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाने 2-1 अशी सरशी साधली. ट्वेंटी-20 मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला तर कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी अनिर्णित राखण्यात कांगारूंना यश आले.
यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. रोहितने 9 धावा केल्या.  त्यामुळे भारताची अवस्था 1 बाद 15 अशी बिकट झाली होती. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने डाव काहीसा सावरला. चांगली सुरुवात करणार्‍या शिखर धवनला नंतर फटकेबाजी करणे कठीण जात होते. संघाची धावसंख्या 59 असताना शिखर (23 धावा) बाद झाला. त्यानंतर विराटने महेंद्रसिंग धोनीला चौथ्या क्रमांकावर बढती दिली. या दोघांवर आता भारताची मोठी भिस्त होती.
धोनी-विराट जोडीने संयमी खेळी करत भारताची धावसंख्या  शंभरीच्या पुढे नेली. यात विराट आणि धोनी या दोघांनाही कांगारूंनी जीवदाने दिली. 12 व्या षटकात बिली स्टॅनलेकच्या गोलंदाजीवर पीटर हँडस्कॉम्बने विराटचा झेल सोडला. त्यावेळी विराट 10 धावांवर होता. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विराटला बाद करण्यात कांगारूंना अपयश आले. धोनीही एकदा धावचित होता होता वाचला. त्याशिवाय त्याचा एक झेल घेतला गेला तरी कांगारूंनी आत्मविश्‍वासाने अपील केले नाही. त्यामुळे पंचांनी धोनीला नाबाद ठरवले. नंतर रिप्लेमध्ये चेंडू धोनीच्या बॅटला चाटून यष्टीरक्षकाकडे गेल्याचे स्पष्ट दिसत होते; परंतु तोपर्यंत कांगारूंनी संधी गमावली होती.
दरम्यान, विराट 46 धावा करून बाद झाल्यावर धोनीने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याला केदार जाधवची जबरदस्त साथ मिळाली. सुरुवातीच्या षटकांनंतर खेळपट्टी इतकी संथ होत गेली, की चेंडू झपकन बॅटवर येत नसल्याने फलंदाजांना मोठे फटके मारणे कठीण जात होते.  मात्र, धोनी व केदार यांनी चपळाईने एकेरी-दुहेरी धावा काढत विजयाच्या दिशेने कूच केली. प्रसंगी खराब चेंडूंचाही दोघांनी समाचार घेत अधूनमधून चौकार लगावलेे. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचून भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. धोनी आणि केदारने सुरेख फलंदाजी करत भारताला 231 धावांचे लक्ष्य गाठून दिले. धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 तर केदार जाधवने 57 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी केली. केदारने सात चौकार खेचले. या सामन्यात दोन्ही संघांच्या इतर फलंदाजांपेक्षा सर्वाधिक चौकार केदारने लगावले.
तत्पूर्वी, नाणेफेकीचा कौल सलग तिसर्‍यांदा ऑसी कर्णधार अ‍ॅरोन फिंचच्या बाजूने गेला. संथ खेळपट्टीवर त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने कुलदीप यादवच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला आणि अंबाती रायुडूच्या जागी केदार जाधवला संधी दिली. दोघांनीही या संधीचे सोने केले. युजवेंद्रच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियालाला 230 धावांवर रोखण्यात यश मिळवले. चहलने 42 चेंडूत 6 बळी घेतले. यापूर्वी याच मैदानावर 2004 मध्ये अजित आगरकरने कांगारूंचे सहा बळी घेतले होते. त्यावेळी भारताने सामना गमावला होता. मात्र, यावेळी चहलच्या फिरकीने भारताला विजय मिळवून दिला. भुवनेश्‍वरकुमारने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. त्यानंतर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा यांनी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. मात्र, शॉन मार्श माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा कोलमडला. चहलने ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. मधल्या फळीत पीटर हँडस्कॉम्बने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत अर्धशतक झळकावले. मात्र, तोदेखील माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज फारसा तग धरू शकले नाहीत. अखेर 230 धावांत ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. भारताकडून चहलने सहा बळी घेतले. भुवनेश्‍वरकुमार आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: