Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोन सराईत गुन्हेगारांना अटक
ऐक्य समूह
Friday, January 25, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: lo2
दोन दुचाकी हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
5सातारा, दि. 24 : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील 2 सराईत गुन्हेगारांना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अटक करून त्यांच्याकडून 94 हजार 150 रुपयांच्या दोन दुचाकी, एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्ह्यामधील वाढत्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड यांनी एक पथक तयार केले होते. या पथकाला फलटण शहर व ग्रामीण परिसरातील चोरीचे पुणे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार दि.23 जानेवारी रोजी विजय कुंभार यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड आपल्या पथकासह गोखळीपाटी, ता. फलटण गावच्या हद्दीत आसू ते फलटण मार्गावर पेट्रोलिंग करत असताना पोलीस रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार मोटरसायकलवरून जात असताना आढळले. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडे असणार्‍या दोन दुचाक्या आणि मोबाईल हे माळेगाव, ता. बारामती व जेजुरी परिसरातून चोरून आणून ते विक्री करण्यासाठी फलटण परिसरामध्ये आले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून अक्षय बाळासाहेब वावरे (वय 19), रा. माळेगाव, ता. बारामती, किरण भीमदेव लकडे (वय 19), रा. पणदरे, ता. बारामती या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यात असलेल्या हिरो होंडाच्या दोन दुचाकी आणि एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. संबंधित आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी याशिवाय इतर ठिकाणी चोर्‍या केल्या असल्याची कबुली दिली असून त्यांच्यासमवेत असणार्‍या अन्य सहकारी आरोपींची नावे तपासात निष्पन्न होऊन आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींना पुढील तपासासाठी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: