Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उदयनराजे-शिवेंद्रराजेंचे पुन्हा ‘हम साथ साथ है’?
ऐक्य समूह
Monday, January 28, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 27 : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर सातार्‍यातल्या दोन्ही राजांचे शनिवारी मनोमीलन झाल्याची चर्चा आहे. पवारांसोबत दोन्ही राजे काल एकाच गाडीतून कार्यक्रमाला पोहोचले. त्यानंतर पुन्हा एकदा दोघांचे सूर जुळल्याचे चित्र दिसले.
रविवारी भल्या पहाटे सातारा हिल मॅरेथॉनच्यावतीने उभारण्यात आलेल्या रनर्स पॉइंटच्या उद्घाटनासाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले होते. त्यावेळी आयोजकांनी दोघांनाही धावण्याची विनंती केली. त्यावर तुम्ही सगळे मिळून एवढं पळवताय की, आमची पळायची हौसच फिटलीय, असे उत्तर उदयनराजेंनी आपल्या खास दिलखुलास अंदाजात दिले आणि तिथे चांगलाच हशा पिकला.
दोन्ही राजे-पवार एकाच गाडीत
दरम्यान, प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी सातार्‍यात राजकीय चमत्कार पहायला मिळाला. हा चमत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रसिंहराजे   यांच्यातले वैर सर्वांनाच माहिती आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही. मात्र, या दोघांना सोबत आणण्याची किमया शरद पवारांनी घडवली. राजघराण्यातील दोघे भाऊ, पण एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी झाले होते. सातारा नगरपालिका निवडणुकीत त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि हा वाद धुमसत राहिला. कधी टोलनाक्याचं व्यवस्थापन असो किंवा दारुचे दुकान हटवण्याचा वाद असो. दोन्ही बंधू एकमेकांसमोर उभे ठाकल्याने अनेकवेळा तणावाचे प्रसंग निर्माण झाले. अलीकडेच कुडाळमधल्या मंदिरातील कार्यक्रमाच्या ठिकाणी हे दोघेही आमने सामने आले. तेव्हा त्यांच्यात रंगलेला मिश्किल सामना सगळ्यांनी पाहिला. खा. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा खांदा दाबला. तेव्हा ‘माझा खांदा का दाबताय’, असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी केला. त्यावर फिटनेस चेक करतोय, असे मिश्किल उत्तर उदयनराजेंनी दिले. तेव्हा माझा फिटनेस कायमच चांगला आहे, प्रात्यक्षिक दाखवू का, असा मार्मिक टोला शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.
शनिवारी खाजगी कार्यक्रमासाठी शरद पवार सातार्‍याला आले होते. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले ते उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांना सोबत घेऊनच. एकाच गाडीतून या तिघांना एकत्र उतरताना पाहून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे शिवेंद्रराजे भोसले हे स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्यासोबत शरद पवार पुढच्या सीटवर बसले होते. तर उदयनराजे मधल्या सीटवर होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या दोघा बंधूराजांमधील वाद मिटावा, यासाठी पवारांनी स्वतः मध्यस्थी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सातार्‍यातून लोकसभेची उमेदवारी पुन्हा खा. उदयनराजेंना मिळणार, अशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिली होती. आजच्या भेटीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता दोन्ही राजांमध्ये खरंच मनामीलन झालंय की, ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे, हे निवडणुकीत कळेलच, कारण घोडामैदान आता फार दूर नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: