Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाईतील पुरातन वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी
ऐक्य समूह
Wednesday, February 06, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: re3
भर बाजारपेठेतील घटना; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
5वाई, दि. 5 ः येथील भाजी मंडईतील जुन्या शिंदे वाड्यास मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास अचानक आग लागली. भर बाजारपेठेतील वाड्यास आग लागल्याने थोडा वेळ घबराट पसरली होती. आगीत ही पुरातन वास्तू जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे चार बंब व दोन टँकरच्या सहाय्याने साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील भाजी मंडईत मोहन गणपत शिंदे यांचा पुरातन चौसोपी वाडा आहे. वाडा मोडकळीस आल्याने त्यात कोणीही वास्तव्यास नाही. वाड्याच्या आतील भागात मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास अचानक आग लागली. थोड्या वेळातच धूर बाहेर येऊ लागल्याने मंडईतील लोकांनी तातडीने वाई पालिकेला कळविले. थोड्याच वेळात सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन एडगे व कर्मचारी, मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ, पालिका अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर पालिका व किसनवीर साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या चार बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली होती. काही तरुण कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना मदत करत होते. मदतकार्यात बघ्यांचा अडथळा येत असल्याने पोलिसांना गर्दी हटवण्याबरोबर हौशी तरुणांना आवरावे लागत होते. या आगीत वाडा जवळपास खाक झाला आहे. वाड्याला लागूनच जिल्हा बँकेची शाखा व कमर्शिअल कॉम्प्लेक्स असल्याने आग आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. नगराध्यक्ष डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, राजेश गुरव, भारत खामकर, सौ. वासंती ढेकाणे, सौ. रूपाली वनारसे, विजयाताई भोसले, अजित वनारसे, धनंजय बनकर, विजय ढेकाणे, अजित शिंदे, बाळू भुसारी, दीपक हजारे, रमेश गांधी, रजपूत यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: