Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अशोकरावांना भविष्य वर्तवण्याची सवय : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:35 AM (IST)
Tags: mn5
5मुंबई, दि.8 (प्रतिनिधी) : दि. 28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जातील, असा दावा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला आहे. अशोकरावांना भविष्य वर्तवण्याची सवय जडली आहे. त्यांच्याकडे सध्या पक्षाचे काहीच काम उरलेले नाही. त्यामुळे ते अशी विधाने करत सुटले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी औरंगाबादमधील सभेत विधानसभा बरखास्त करण्यासंदर्भात विधान केले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू असून दि. 28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील, असा दावा त्यांनी केला होता.
अशोक चव्हाण यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पालघरमध्ये प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण यांना हल्ली भविष्य वर्तवण्याची सवय जडली आहे. पक्षात त्यांची कामे संपलेली आहेत किंवा त्यांना काही कामे उरलेली नाहीत. त्यामुळे असे भाकित ते वर्तवत आहेत. अशोकरावांनी विरोधी पक्षात बसण्याची घाई करू नये. आम्ही योग्य वेळीच निवडणूक घेऊ आणि विधानसभा निवडणूक आधी घेण्याचा आमचा कोणताही विचार नाही,
असे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात दोन महिन्यापासून भूकंपाचे झटके येत आहेत. या भूकंपाची तीव्रता कमी असली काही प्रसंगी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 पर्यंत पोहोचली. पालघरमधील भूकंपग्रस्त भागात चार यंत्रे बसवण्यात आली असून आम्ही या संदर्भात मुंबई आयआयटीशी मदत घेत आहोत. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकही या भागात तैनात करण्यात आले आहे, असे
त्यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: