Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारताचा न्यूझीलंडवर 7 गडी राखून विजय
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:37 AM (IST)
Tags: sp1
5वेलिंग्टन, दि. 8 (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज खेळवल्या गेलेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडला सात गडी राखून पराभूत केले. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधत या मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. मालिका विजयासाठी आता तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.
ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला. कॉलिन डी ग्रॅण्डहोमे व रॉस टेलर वगळता न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूला खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही. न्यूझीलंडकडून ग्रँडहोमे याने 50 तर  टेलरने 42 धावा केल्या. भारतातर्फे कृणाल पंड्याने केवळ 28 धावा देत तीन बळी घेतले. अहमदने 27 धावा देत न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले. न्यूझीलंडने 20 षटकांत 8 बाद 158 धावा केल्या.
159 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा याने 29 चेंडूंमध्ये शानदार अर्धशतक झळकावले. त्यात चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. या सामन्यात त्याने टी-20 मधील सर्वाधिक धावांचा विक्रमही नोंदवला. शिखर धवनने 30 आणि ऋषभ पंतने 40 धावा केल्या. हे तिघे बाद झाल्यानंतर विजय शंकर व महेंद्रसिंह धोनीने सर्व सूत्रे हातात घेत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. सात चेंडू शिल्लक असताना 162 धावा करून भारताने हा सामना खिशात घातला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने तुफान फटकेबाजी केली. त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 28 चेंडूत अर्धशतक ठोकले. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
रोहित शर्माने रचला इतिहास
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रोहितने टी-20 इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. आजच्या खेळीमुळे रोहितच्या टी -20 क्रिकेटमध्ये 2276 धावा झाल्या. त्याने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याला मागे टाकत हा इतिहास रचला. या बरोबरच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तीनही प्रकारात सर्वाधिक धावा करणार्‍या यादीत भारतीय खेळाडूंना अव्वल स्थान मिळाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कसोटीमध्ये 15,921 धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 धावा करून अव्वल आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: