Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीरच्या सीआरपीएफच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला
ऐक्य समूह
Monday, February 11, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: mn2
5जम्मू, दि. 10 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांकडून सातत्याने राबवण्यात येत असलेल्या सफल मोहिमेमुळे सैरभैर झालेल्या दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या लाल चौकाजवळील पल्लडिअम लेनमध्ये असलेल्या सीआरपीएफच्या एका तुकडीवर आज (दि.10) सायंकाळच्या सुमारास ग्रेनेड हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे 3, जम्मू-काश्मीर पोलिसांचे 4 जवान व 4 स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये रविवारी सकाळी लष्कराने केलेल्या एका मोठ्या ऑपरेशनमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. आठ तासाहून अधिक काळ चाललेल्या या चकमकीत जवानांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळून मोठ्या प्रमाणावर हत्यारे, दारुगोळा आणि सामान जप्त करण्यात आले होते. हा हल्ला जिव्हारी लागल्यानेच चवताळलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर प्रतिहल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.
लष्काराला शनिवारी केलम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर लष्कराच्या 9 राष्ट्रीय रायफल्स,    जम्मू-काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलम गावाला घेराव घातला होता. त्यानंतर जवानांनी या भागात शोध मोहीम राबवली. जिथे दोन घरांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरु केला होता. याला जवानांनीही सडेतोड उत्तर दिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: