Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘चिनुक’मुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढली
ऐक्य समूह
Monday, February 11, 2019 AT 11:40 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या चिनुक हेलिकॉप्टर्सची पहिली वहिली बॅच गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर दाखल झाल्यामुळे भारतीय वायुसेनेच्या ताकदीत वाढ झाली आहे. लवकरच हे चिनुक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सियाचीन आणि लदाख अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबर 2015 मध्ये भारत सरकारने अमेरिकेकडून 22 अ‍ॅपॅचे हेलिकॉप्टर्स व 15 चिनुक हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला आहे. याच वर्षी सर्व 15 हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील, अशी शक्यता वायुसेनेकडून वर्तवण्यात आली आहे.
बोइंग सीएच-47 चिनुक हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते सहज ओळखता येते.
अमेरिकी सैन्य दलांना 1956 मध्ये जुन्या सिकोस्क्री सीएच-37 ही मालवाहू हेलिकॉप्टर बदलण्यासाठी नवे हेलिकॉप्टर हवे होते. बर्‍याच विचारविनिमयानंतर व्हटरेल मॉडेल 114 किंवा वायएचसी-1 बी नावाचे हेलिकॉप्टर स्वीकारण्याचे ठरले. या हेलिकॉप्टरचे पहिले उड्डाण 21 सप्टेंबर 1961 रोजी झाले. व्हटरेल ही कंपनी 1962 मध्ये बोईंगने खरेदी केली. त्यानंतर या हेलिकॉप्टरचे नाव बोईंग सीएच-47 ए चिनुक असे ठेवले गेले. ते ऑगस्ट 1962 मध्ये अमेरिकी सैन्य दलात दाखल झाले. त्यानंतर आजतागायत 40 वर्षांहून अधिक काळ ते 17 देशांच्या हवाई दलात प्रभावीपणे कार्यरत आहे.
टॅण्डम रोटर हे बोईंग सीएच-47 चिनुक हेलिकॉप्टरचे मुख्य वैशिष्ट्य. त्यावर दोन टोकांना दोन मोठे पंखे आहेत. ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे एका रोटरने तयार होणारा टॉर्क दुसर्‍या रोटरने नाहीसा होतो. म्हणजेच पंखा एका दिशेने फिरू लागले,  की हेलिकॉप्टर दुसर्‍या दिशेने गोलाकार फिरू लागते. हा परिणाम (टॉर्क) नाहीसा करण्यासाठी सामान्य हेलिकॉप्टरला शेपटाकडे लहान व उभा रोटर असतो. त्याची चिनुकमध्ये गरज नाही. त्यामुळे चिनुकला उड्डाणादरम्यान असाधारण स्थैर्य लाभते. परिणामी खराब हवामानात जिथे अन्य हेलिकॉप्टर वापरता येत नाहीत तिथे चिनुक वापरता येते.
त्याचे प्रशस्त फ्युजलाज आणि मागील भागातील विस्तृत दरवाजामुळे त्यात अवजड लष्करी वाहनेही भरून वाहून नेता येतात. त्याच्या तळाला तीन हूक असून त्याला टांगून तोफा, चिलखती वाहने, जीप आदी वाहून नेता येतात. त्याचे रिकामे असतानाचे वजन 10,615 किलो तर भरल्यानंतरचे 22,680 किलो असते. ते ताशी 269 किमी वेगाने 1200 किमी अंतराचा प्रवास करू शकते. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक आदी लष्करी कारवायांमध्ये त्याचा वापर करण्यात आला. अमेरिकेसह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इराण, ग्रीस, इटली, जपान, स्पेन आदी देशांकडे चिनुक आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: