Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुर्जर आंदोलनाला हिंसक वळण
ऐक्य समूह
Monday, February 11, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: na1
धोलपूरमध्ये दगडफेक अन् गोळीबार, तीन गाड्या जाळल्या
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : राजस्थानमधील गुर्जर समाजाने छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी धोलपूरमध्ये दगडफेक आणि गोळीबार केला आहे. तसेच तीन गाड्यांची जाळपोळही करण्यात आली आहे. धोलपूरच्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जाम केल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्‍चक्री उडाली. त्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनीही हवेत गोळीबार केला. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. जमावाने तीन गाड्यांची जाळपोळ केली असून दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
आंदोलकांनी दुपारी धोलपूर शहरात आरक्षणासाठी एक बैठक घेतली. त्यानंतर आंदोलकांनी दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. त्याचदरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. जमावानेही पोलिसांच्या अंगावर दगड भिरकावले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर आंदोलक चंबलकडे पळाले. दगडफेक आणि गोळीबारानंतर मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
राजस्थानमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गुर्जर समुदायाने रेल रोकोही केला होता. गुर्जरांनी राजस्थान राज्यात नोकरी आणि शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. गुर्जर समाजाचे आंदोलक सवाई माधोपूरमध्ये रेल्वेच्या रुळावर उतरले होते. त्यामुळे भारतीय रेल्वेने वांद्रे टर्मिनस आणि सवाई माधोपूरपर्यंत स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: