Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी महाबळेश्‍वरमधील आलिशान हॉटेलला टाळे
ऐक्य समूह
Thursday, February 14, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: re5
तहसीलदारांच्या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले
5महाबळेश्‍वर, दि. 13 : येथील तहसीलदार मीनल कळसकर यांनी आदेशानुसार बेकायदेशीर बांधकामावर मोठी कारवाई करत महाबळेश्‍वर-पाचगणी रस्त्यावरील लिंगमाळा परिसरातील किंग गार्डन या आलिशान हॉटेलला टाळे ठोकले. तहसीलदारांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर बांधकाम करून विना परवाना हॉटेल व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले आहेत.
पर्यटकांचे माहेरघर म्हणून महाबळेश्‍वर हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी सुमारे वीस लाख पर्यटक भेट देवून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. पर्यटन हाच या ठिकाणच्या स्थानिक लोकांचा रोजगार. या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी न्याहरी व निवास ही योजना राज्य शासनाने सुरू केली. या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला आहे. देशातील अनेक धनिकांनी आपला काळा पैसा येथील जमीन खरेदीमध्ये गुंतविला व हॉटेल व्यवसाय सुरू केला. काही धनिकांनी स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरून भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय करताना अनेकांनी विनापरवाना बांधकामे केली आहेत. कोणताही परवाना न घेता हॉटेल व्यवसाय सुरू केले आहेत. कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून बेकायदेशीर बांधकामांचे येथे पेव फुटले. पाहता पाहता महाबळेश्‍वर -पाचगणी रस्त्यावर हजारो रूम तयार झाली. या विनापरवाना व्यवसायासाठी वीज व पाणी हे घरगुती दराने वापरले जात होते. अनेकजण तर कोणताही कर भरत नसल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे या विनापरवाना बांधकाम व व्यवसायामुळे शहरात अधिकृत हॉटेल व्यवसाय करणारांचे कंबरडे मोडले. वीज व पाणी हे वाणिज्य दराने ते भरतात तसेच शासनाचे सर्व कर नियमानुसार त्यांना भरावे लागतात. महाबळेश्‍वर व पाचगणी येथील अशा बेकायदेशीर बांधकामांबाबत अनेक तक्रारी सुरू झाल्या. परंतु कारवाई होत नव्हती. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकामे सुरू आहेत.
याबाबत अनेकांनी उच्चस्तरीय सनियंत्रण समितीकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची संख्या वाढत गेल्याने महाबळेश्‍वर-पाचगणी पालिकांच्या मुख्याधिकार्‍यांना शहर परिसरातील तर तहसीलदारांना ग्रामीण भागातील बेकायदेशीर बांधकामे आणि तेथे सुरू असलेल्या विनापरवाना व्यवसायांची पाहणी करण्याच्या सूचना समितीने केल्या. शहरातील प्रशासन कासवगतीने पाहणी करत असले तरी येथील तहसीलदारांनी या बाबत तातडीने कारवाई सुरू केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी लिंगमळा परिसरातील साज हॉटेल शेजारी असलेले किंग गार्डन या आलिशान हॉटेलवर कारवाईचा बडगा उचलला. या हॉटेलमध्ये 24 खोल्या, रेस्टॉरंट, स्वागत कक्ष, स्विमिंग पूल, स्वयंपाकघर, सर्वंट क्वार्टर, असे विनापरवाना बांधकाम करण्यात आले होते. हे सर्व बांधकाम रहिवास कारणासाठी बांधून तेथे वाणिज्य वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार मीनल कळसकर यांनी या हॉटेलला सील ठोकले आहे. अशा प्रकारे बेकादेशीर बांधकाम करून हॉटेल व्यवसाय करणारांवर या पुढील काळात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मीनल कळसकर यांनी दिली.
बोंडारवाडी येथेही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकामे करून अनेक धनिकांनी आपला हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. अनेकांनी आपल्या हॉटेलचे आरक्षण ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बोंडारवाडी प्रमाणेच महाबळेश्‍वर -पाचगणी रस्त्यावरील प्रत्येक गावात महसूल विभागाच्यावतीने पाहणी करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने अशा बेकायदेशीर बांधकाम केलेल्या हॉटेलना सील ठोकण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वेण्णालेक ते लिंगमळा परिसर व बोंडारवाडी हा भाग आता महसूल विभागाच्या रडारवर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पुढील काळात आता कोणावर कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: