Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

सातारच्या चार खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर
ऐक्य समूह
Friday, February 15, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: sp1
साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहितेला
5मुंबई, दि. 14 : राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी 2017-18 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार मल्लखांब क्षेत्रात प्रशिक्षण देणारे उदय विश्‍वनाथ देशपांडे यांना घोषित झाला आहे तर शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार सातार्‍याच्या प्रियंका मंगेश मोहिते (गिर्यारोहण) हिला घोषित झाला आहे. या पुरस्कारांमध्ये सातार्‍याचा डंका जोरात वाजला असून प्रियांका मोहितेसह कालिदास लक्ष्मण हिरवे (अ‍ॅथलेटिक्स), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग) आणि प्रवीण रमेश जाधव (आर्चरी) यांनाही शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत.
तावडे यांनी घोषित केलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, ट्रायथलॉन, वुशू, स्केटिंग, हॅण्डबॉल, जलतरण, कॅरम, जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, तलवारबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, रोईंग, शूटिंग, बिलियर्डस् अ‍ॅण्ड स्नूकर, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, मल्लखांब, आट्यापाट्या, कबड्डी, खोखो, कुस्ती, बुद्धिबळ, टेनिस, व्हॉलीबॉल, सायकलिंग, स्न्वॅश, क्रिकेट, हॉकी या विभागातील 55 खेळाडूंचा समावेश आहे. 2017-18 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक-कार्यकर्ते या विभागात सात पुरस्कारांचा तर एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यामध्ये 9 पुरस्कारांचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 15 जणांना घोषित करण्यात आला आहे. येत्या रविवारी (दि. 17) गेट वे ऑफ इंडिया येथे होणार्‍या या समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ब्लेझर तर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ब्लेझर असे आहे. शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य खेळाडू, संघटक, मार्गदर्शकांची निवड केली आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात असल्याचे क्रीडा मंत्री तावडे यांनी सांगितले.
पुरस्कार निवड समितीत विनोद तावडे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त, पद्मश्री धनराज पिल्ले, पद्मश्री प्रभाकर वैद्य, अर्जुन पुरस्कारार्थी रचिता मिस्त्री, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रदीप गंधे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी जय कवळी, पॅरा ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी राजाराम घाग, अर्जुन पुरस्कारार्थी श्रीरंग इनामदार यांचा समावेश होता. या सदस्यांनी एकमताने सन 2017-18 या वर्षातील पुरस्कारार्थींची निवड केल्याचे तावडे यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: