Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
थकीत रकमेच्या विषयावरून जोरदार वादावादी
ऐक्य समूह
Wednesday, February 20, 2019 AT 11:45 AM (IST)
Tags: lo3
घंटागाडी चालकांच्या प्रश्‍नी बैठकीत आरोप-प्रत्यारोप
5सातारा, दि. 19 : छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये सातारा मशगूल असताना पालिकेत मात्र साशा कंपनी व संपकरी घंटागाडी चालक यांच्यात थकीत रकमेच्या विषयावरून जोरदार वादावादी झाली. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केलेला शिष्टाईचा प्रयत्न सफल झाला नाही. चर्चेचे गुर्‍हाळ दीड तास चालले. मात्र तोडगा काहीच निघाला नाही. साशाचे भागीदार संचालक एस. आर. शिंदे , कर्मचारी युनियनचे सचिव गणेश भिसे, पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे या त्रयींची बैठक मुख्याधिकार्‍यांच्या दालनात झाली, मात्र प्रत्यक्ष चर्चेत आरोप- प्रत्यारोपच झाल्याने तोडग्यापेक्षा वादच होत राहिले. साशा कंपनीने 20 हजार वेतनाचे नियम ठरवून प्रत्यक्षात 8 हजार रुपये कमी वेतन दिले, प्रत्यक्ष कामाच्या वेळी घंटागाडी चालकांना दंड करण्यात आला, तसेच वेतनात न राखलेले सातत्य यासारख्या विविध विषयांची बाजू कामगार संघटनेचे सचिव गणेश भिसे यांनी मांडत थकीत वेतनासह बोनसची मागणी केली. तब्बल 4 महिने पगारच न मिळाल्याने घंटागाडी चालकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे जी कपात झाली त्या कपातीसह वेतन अदा करण्याचा धोशा घंटागाडी चालकांनी लावत साशावर आपला राग व्यक्त केला. कंपनीचे भागीदार संचालक एस. एस. शिंदे यांनी तब्बल 14 महिने काम व्यवस्थित झाले. मग संप आत्ताच का  आणि कारण काय  असा प्रतिप्रश्‍न केला.        
ज्या घंटागाड्यांनी सोनगावला नियमित फेर्‍या केल्या त्यांचे पूर्ण वेतन काढण्यात आले. ज्यांनी कामात टाळाटाळ केली त्यांच्या वेतनात कपात करण्यात आली. त्याची कारणे सुद्धा कंपनीकडे लेखी स्वरूपात उपलब्ध आहेत. ती कारणे आम्हाला कळवावीत अशी मागणी भिसे यांनी करत वादाच्या मूळ मुद्याला हात घातला. जिथे सफाई झाली नाही तिथे प्रसंगी कंपनीला जादा ट्रॅक्टर लावावे लागले, बहुतांश वेळा घंटागाडी चालकांच्या फेर्‍या नियमित होत नव्हत्या म्हणूनच कंपनीने कारवाई केली आणि कामगारांचे पगार रीतसर ऑनलाइन जमा करण्यात आले. त्यामुळे फसवण्याचा प्रश्‍नच येत नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. कामगारांनी पुन्हा बोनसची मागणी केली मात्र साशाने ती फेटाळून लावली. त्यामुळे प्रत्यक्ष चर्चेत काहीच निष्पन्न न होता वादावादीच जास्त झाली. मात्र घंटागाडी चालकांच्या प्रतिनिधींनी पुढे काय निर्णय घेतला हे समजू शकले नाही. या पार्श्‍वभूमीवर मुख्याधिकार्‍यांनी येत्या आठ दिवसात नव्या ठेकेदारांकडे हा विषय वर्ग होईल असे स्पष्ट संकेत पत्रकारांशी बोलताना दिले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: