Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
ऐक्य समूह
Thursday, February 21, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 20 : फडतरवाडी, ता. फलटण येथील दोघांना मारहाण करून, त्यांच्यावर तलवारीने वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी पाच जणांना 7 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 12 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, राजेंद्र पांडुरंग फडतरे हे आपले बंधू रमेश पांडुरंग फडतरे, दोघे रा. फडतरवाडी, ता. फलटण यांच्यासमवेत 24 ऑगस्ट 2013 रोजी दुचाकीवरून शेतात जात असताना सामायिक जागेत विजेचा खांब रोवण्याच्या कारणावरून दत्तात्रय शंकर फडतरे, बाळू दत्तात्रय फडतरे, नितीन प्रकाश जाधव, विनोद प्रकाश जाधव, संतोष दत्तात्रय फडतरे यांनी राजेंद्र फडतरे आणि रमेश फडतरे यांना दमदाटी करून मारहाण केली तर राजेंद्र फडतरे यांच्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्यात राजेंद्र फडतरे जखमी झाल्याने त्यांना प्रथम फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजेंद्र फडतरे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे अशा सूचना केल्या. त्यानंतर राजेंद्र फडतरे यांना फलटण येथील जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी झालेल्या घटनेची फिर्याद रमेश फडतरे यांनी दिली. फलटण ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने एकूण 16 साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. जिल्हा सरकारी वकील महेश ना. कुलकर्णी यांनी न्यायालयासमोर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देऊन युक्तिवाद केला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी राजेंद्र पांडुरंग फडतरे यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि रमेश पांडुरंग फडतरे यांना मारहाण केल्या प्रकरणी दत्तात्रय शंकर फडतरे, बाळू दत्तात्रय फडतरे ( मयत) , नितीन प्रकाश जाधव, विनोद प्रकाश जाधव, सतीश दत्तात्रय फडतरे या पाच जणांना 7 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 12 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: