Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरींचा विशेष हक्क राहणार की जाणार?; आज सुनावणी
ऐक्य समूह
Monday, February 25, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: mn4
5श्रीनगर, दि. 24 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणार्‍या राज्यघटनेतील कलम 35 अ या कलमासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवार, दि. 25 रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर काश्मीर खोर्‍यात तणाव असून शुक्रवारनंतर रात्रभरात जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर या संघटनेच्या जवळपास दीडशे जणांची धरपकड करण्यात आली आहे.
राज्यघटनेच्या कलम 35अ अन्वये जम्मू-काश्मीर मधील नागरिकांना काही विशेष हक्क देण्यात आले आहेत. 1954 मध्ये ही तरतूद समाविष्ट करण्यात आली होती. या कलमाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही सुनावणी सोमवारी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात तणाव स्पष्ट दिसत आहे. सुरक्षा बंदोबस्तही कडक करण्यात आला आहे. निमलष्करी दलाच्या अतिरिक्त शंभर तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
ही धरपकड नियमित कारवाईचा भाग असल्याचे पोलीस सांगत असले, तरीही या घडामोडींची माहिती असलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या मते जमात-ए-इस्लामीवरील ही पहिलीच महत्त्वाची कारवाई आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर फुटीरतावाद्यांच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली असून जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक यालाही शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: