Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
ऐक्य समूह
Tuesday, February 26, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: mn4
विरोधकांची घोषणाबाजी, अभिभाषणावर बहिष्कार
5मुंबई, दि. 25 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आक्रमक विरोधकांच्या घोषणाबाजीने झाली. विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीतील अभिभाषणासाठी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे विधान भवनात आगमन झाले, तेव्हा विरोधकांनी प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करतच त्यांचे स्वागत केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन केल्याबद्दल राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा देताना विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला होता. राज्यपालांच्या अभिभाषणावरही विरोधकांनी बहिष्कार घातला.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज झाली. या वर्षातील पहिले अधिवेशन असल्याने विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीसमोरील अभिभाषणासाठी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे सकाळी विधानभवनात आगमन झाले, तेव्हा विरोधकांनी प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन करणार्‍या विरोधी आमदारांच्या गर्दीतून वाट काढत सुरक्षारक्षकांनी राजपालांना संयुक्त सभागृहात नेले.
‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’, अशा घोषणांचे फलक फडकावत राज्यपालांच्या निषेध करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. राज्यपाल हे पद घटनात्मक असताना, ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे’, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल, की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे, याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घालत आहोत, असे धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: