Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईवर विशेष लक्ष
ऐक्य समूह
Tuesday, February 26, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: lo3
तेजस्वी सातपुते : बाधक गुन्हेगारी मोडीत काढणार
5सातारा, दि. 25 : सातारा शहराची ऐतिहासिक, समृद्ध व शांत अशी ओळख आहे. पोलीस अधीक्षक कालावधीत ही ओळख आणखी वाढवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. याला जर बाधक असणारी गुन्हेगारी असेल ती मोडीत काढणार असल्याचा इरादाही नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, गुन्हेगारी निर्मूलनासाठी बेसिक पोलिसिंग, वाहतुकीसाठी स्वयंशिस्त व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई यावर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र पोलीस दलात आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अवघ्या सात महिन्यांमध्ये पुणे येथे बदली झाली आहे.  त्यांच्या जागी नव्या पोलीस अधीक्षक म्हणून तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सातपुते म्हणाल्या, सातारचा इतिहास ज्वलंत, रोमांचकारी आहे तसेच सातारा शहरासह जिल्ह्याची शांत व समृद्ध अशी ओळख आहे. आजपर्यंत सातारला जाणे कधी झाले नाही. मात्र आपले पोस्िंटग सातारला झाले असल्याचे समजताच आपण सुखावलो आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून हे आपले पहिलेच पोस्िंटग आहे. यापूर्वी जालना, सीआयडी, पुणे ग्रामीण येथे एक-एक वर्षासाठी काम केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पुणे येथे वाहतूक विभागाचा कार्यभार केला असल्याचे त्या म्हणाल्या.
सातारातील वाहतूक हा कळीचा मुद्दा असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या, पुणे येथे गेल्या सहा महिन्यात आपण आपले बेस्ट एफर्ट दिले आहेत. यामुळे अनेक सकारात्मक बदलही झाले आहेत. पुणे येथे ज्या कल्पना वापरल्या तो अनुभव म्हणून सातार्‍यात वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारीबाबत त्या म्हणाल्या, जगात कुठेही गुन्हेगारी नाही असे नाही. मात्र सातार्‍यात गुन्हेगारी कमी कशी राहील व त्यावर जास्तीत जास्त प्रतिबंध कसा राहील यावर आपले विशेष लक्ष असणार असल्याचे त्या म्हणाल्या. यासाठी बेसिक पोलिसिंगवर भर दिला जाईल. सध्या  कोर्टात जे मोक्काचे खटले सुरू आहेत ते कसे टिकतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सातार्‍यात यापूर्वी डॅशिंग आयपीएस म्हणून मीरा बोरवणकर यांनी काम केले आहे. महिला आयपीएस म्हणून तेजस्वी सातपुते आता दुसर्‍या महिला जिल्हा पोलीस प्रमुख ठरणार आहेत. याबाबत एसपी सातपुते यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आयपीएस मीरा बोरवणकर या आपल्या आयडॉल आहेत. पोलीस दलातील त्यांनी केलेले काम आपण पाहत आलो आहे. त्यांच्याप्रमाणेच आपणाला काम करायची इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: