Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

दहशतवादी तळांवर हल्ले सुरुच राहणार
ऐक्य समूह
Friday, March 01, 2019 AT 11:48 AM (IST)
Tags: mn1
भारतात एफ-16 विमानांनी घुसखोरी केल्याचे पुरावे
5नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : आमची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत राहील तोपर्यंत भारत दहशतवादी तळांवरील हल्ले सुरुच ठेवेल, असा नि:संदिग्ध इशारा भारताच्या तिन्ही संरक्षण दलांच्या अधिकार्‍यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत पाकला दिला. पाकिस्तानला काय हवे आहे, हे आता त्यांनीच ठरवायचे आहे. त्यांच्या दुस्साहसाला तोंड देण्यासाठी तिन्ही दले सज्ज आहेत, असेही त्यांनी ठणकावले. त्याच वेळी काल भारतीय हद्दीत पाकिस्तानच्या तीन एफ-16 विमानांनी घुसखोरी केल्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, असे सांगताना या विमानांवरून डागण्यात येणार्‍या ‘एएआरएम’ (हवेतून हवेत मारा करणारी) क्षेपणास्त्राचे अवशेषही सेनाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. हे भाग जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय हद्दीत सापडल्याचे त्यांनी सांगितले.
विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीनंतर तिन्ही संरक्षण दलांच्या अधिकार्‍यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गेल्या तीन दिवसांपासून भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या सर्व घडामोडींची तपशीलवार माहिती दिली. तिन्ही दलांच्या अधिकार्‍यांनी निवेदन केल्यानंतर संपूर्ण कारवाईबाबत प्रथमच पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरेही दिली.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेला आत्मघाती हल्ला, प्रत्युत्तरादाखल भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर केलेली धडक कारवाई, त्यानंतर भारताने पाकचा उधळलेला हवाई हल्ल्याचा प्रयत्न याबाबत हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल आर. जी. के. कपूर, लष्कराचे मेजर जनरल सुरेंद्रसिंह महल आणि नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल डी. एस. गुजराल यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पाकिस्तानचा खोटारडेपणा
बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान वारंवार खोटी विधाने पसरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कपूर यांनी सांगितले. आधी पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांनी भारताची दोन जेट विमाने पाडली. कपूर म्हणाले, 27 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता हवाई दलाच्या रडारवर पाकिस्तानी एफ-16 जेट विमाने येताना दिसली.                   
आपल्या मिराज 2000, सुखोई 30 आणि मिग-21 या विमानांनी पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत भारताने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले, त्याचे अवशेष पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. या दरम्यान भारताचे केवळ एक मिग 21 विमान पडले. त्याचे वैमानिक पॅराशूटमधून दिशा भरकटून पाकिस्तानी हद्दीत उतरले. तेथे त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. पाकिस्तान खोटे बोलत आहे की, त्यांचे कोणतेच विमान पडले नाही. आम्ही पाकिस्तानच्या दोन वैमानिकांना पडताना पाहिले होते.
पाकिस्तानचे दुसरे खोटे विधान
पाकिस्तानने असा दावा केला होता की, त्यांनी भारतामध्ये मोकळ्या जागेत बॉम्ब टाकले. प्रत्यक्षात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी एक बॉम्ब त्यांनी टाकला; पण त्याने आपले कोणतेही नुकसान झालं नाही, असे कपूर म्हणाले. त्यानंतर पाकिस्तानने आणखी खोटारडेपणा करताना सांगितले की, पाकिस्तानकडून एफ-16 विमानांचा वापर झाला नाही. पाकच्या या खोटारडेपणाचा बुरखा फाडताना एअर व्हाइस मार्शल कपूर यांनी एफ-16 मधून डागलेल्या क्षेपणास्त्राचे तुकडे दाखवले. हे तुकडे काश्मीरमधील राजौरीत सापडले. कपूर यांनी अशीही माहिती दिली की, पाकिस्तानकडे केवळ असे एकच जेट आहे जे ‘अ‍ॅमराम’ क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकते. या विमनाचे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरदेखील पडताळून पाहण्यात आले आहे. पाकिस्तान ज्या जेटचे अवशेष दाखवत आहे, ते मिग 21 चे नसून एफ-16 चे आहेत, असेही कपूर म्हणाले.
दोन दिवसांत 35 वेळा गोळीबार
14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतीही वाढल्या आहेत. भारताने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानी सैन्याने 35 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे मेजर जनरल महल यांनी नमूद केले. बालाकोट येथील भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने 26 फेब्रुवारीला अनेक भागांत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय लष्कराचे ब्रिगेड मुख्यालय, बटालियन मुख्यालय आणि अन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आपल्या हवाई दलाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
आमच्याकडे पुरेसे पुरावे : कपूर
एअर व्हाइस मार्शल कपूर यांनी पाकचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न आणि भारताच्या कारवाईसंदर्भात माहिती दिली. विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तान उद्या सुटका करणार, असे समजले. आम्हाला त्याचा आनंद आह. पाकव्याप्त काश्मीरमधील आणि बालाकोट येथील दहशतवाद्यांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचे पुरावे आमच्याकडे आहेत. हे पुरावे उघड कधी करायचे याचा निर्णय राजकीय नेतृत्व घेईल, असेही त्यांनी सांगितले.
नौदल पूर्ण सज्ज : गुजराल
भारतीय नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल डी.एस. गुजराल यांनी सांगितले की, नौदल सर्व प्रकारे सज्ज आहे. पाकिस्तानने समुद्र मार्गे हल्ल्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही लष्कर, हवाई दलासोबत एकजुटीने काम करून देश पूर्णपणे सुरक्षित ठेवू.
भारताचं युद्ध दहशतवादाविरोधात : महल
भारताचे युद्ध दहशतवादाविरोधात आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत राहील, तोपर्यंत आम्ही पाकपुरस्कृत दहशतवादी तळांवर हल्ले सुरुच ठेवणार, असा निर्धार लष्कराचे मेजर जनरल सुरेंद्रसिंह महल यांनी व्यक्त दाखवला. कोणत्याही दुस्साहसाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ग्वाही त्यांनी भारतीयांना दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: