Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दत्ता जाधवच्या मुलासह चार जणांना मोक्का
ऐक्य समूह
Monday, March 04, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 3 : प्रतापसिंहनगरमधील अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (वय 23) याच्यासह त्याच्या आणखी चार साथीदारांना सातारा पोलिसांनी मोक्का लावला. अठरा दिवसांपूर्वी लल्लन टोळीने एमआयडीसी येथे एकाला दारू पिण्यासाठी पैसे मागून जबर मारहाण केली होती. याच प्रकरणात पोलिसांनी लल्लनसह त्याच्या साथीदारांवर  मोक्काअंतर्गत कारवाई केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 15 फेब्रुवारी रोजी दत्ता उदागे हा युवक एमआयडीसी ते धनगरवाडी रस्त्यावरुन मित्रासोबत निघाला होता. रात्री साडे अकराच्या सुमारास लल्लन जाधव याने त्याच्या साथीदारांसोबत उदागे याचा रस्ता अडवला. त्याला दारु पिण्यासाठी पैसे मागू लागला. संशयितांना पैसे नसल्याचे सांगताच त्यांनी उदागे यांना लोखंडी रॉड डोक्यात घालून   रक्तबंबाळ केले. तसेच कंबरेच्या पट्ट्याने मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. या सर्व घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात लल्लन जाधव याच्यासह त्याच्या चारही साथीदारांंविरुध्द हाफ मर्डरप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या घटनेचा तपास करत लल्लन जाधवला अटक केली. आणखी एका साथीदाराला ताब्यात घेतले. मात्र, तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून अद्याप ते पोलिसांना सापडले नाहीत. दरम्यान, शहर पोलिसांनी ही घटना गंभीर असल्याने व लल्लनवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्यासह या टोळीचा मोक्काअंतर्गत प्रस्ताव तयार केला. प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षक व पुढे कोल्हापूर आयुक्त कार्यालयात पाठवला असता त्याला मंजुरी मिळाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: