Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘जैश’च्या तळावर तीनशे मोबाइल फोन सुरू होते
ऐक्य समूह
Tuesday, March 05, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: na1
तांत्रिक पाळतीच्या आधारे ‘एनटीआरओ’ची माहिती
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये खरोखरच दहशतवादी मारले गेले का, असा प्रश्‍न विरोधी राजकीय पक्ष उपस्थित करत असतानाच नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (एनटीआरओ) या सरकारी संस्थेने दिलेल्या माहितीमुळे या हल्ल्यात तीनशेच्या आसपास दहशतवादी मारले गेले असावेत, याला पुष्टी मिळत आहे. भारतीय हवाई दलाला केंद्र सरकारने पाकिस्तानमधील कारवाईसाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ‘एनटीआरओ’ने बालाकोट येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी तळांवर तांत्रिक साधनांनी पाळत ठेवायला सुरुवात केली. त्यामध्ये हवाई दलाच्या बॉम्ब हल्ल्याच्या आधी जवळपास 300 मोबाइल फोन तेथे सुरू होते, असे समोर आले होते.  
भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील ‘जैश’च्या दहशतवादी तळांवर 26 फेब्रुवारीला पहाटे बॉम्बहल्ले केले होते. हवाई दलाला या हल्ल्यांसाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ‘एनटीआरओ’ने त्या तळांवर पाळत ठेवायला सुरुवात केली होती. त्यावेळी तेथे 300 मोबाइल फोन सुरू असल्याचे लक्षात आले. भारताच्या इतर गुप्तचर संस्थांनीही तेथे तेवढेच दशतवादी असल्याचं सांगितले. त्यानंतर याच ठिकाणांवर हवाई दलाने बॉम्बहल्ले केले. यावेळी भारताच्या इतर गुप्तचर यंत्रणा ‘एनटीआरओ’च्या संपर्कात होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारताच्या ‘मिराज-2000’ या लढाऊ विमानांनी 26 फेब्रुवारीच्या पहाटे साडेतीन वाजणेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन ठिकाणी आणि पाकच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात बालाकोट येथे ‘जैश’च्या मुख्य तळावर बॉम्बहल्ले केले. भारताच्या विमानांनी तेथे ‘स्पाइस 200’ हे प्रत्येकी एक हजार किलो वजनाचे सहा बॉम्ब फेकले. या बॉम्बहल्ल्यांमध्ये ‘जैश’ची प्रशिक्षण छावणी, दारुगोळा कोठार व अन्य इमारती नेस्तनाबूत करण्यात आल्या.
पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळांवर हवाई दलाने बॉम्बहल्ले केले. मात्र, या कारवाईत अधिकृतरीत्या नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची आकडेवारी सरकारने जाहीर केलेली नाही; परंतु याबाबतचे पुरावे आपल्याकडे असून ते जाहीर करण्याचा अधिकार सरकारचा असल्याचे संरक्षण दलांच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: