Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसवणार
ऐक्य समूह
Tuesday, March 05, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: lo1
टीमवर्कवर अधिक विश्‍वास : तेजस्वी सातपुते
5सातारा, दि. 4 : पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या टीमवर्कवर माझा अधिक विश्‍वास आहे. मीडियम कामगिरी करणारा अधिकारी चांगली कामगिरी करू शकतो हे मी जवळून पाहिले आहे, त्यामुळे कर्मचार्‍याचा वेल्फेअर पाहणे हे माझे आद्य कर्तव्य आहे, असे सांगून सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीला आपण आळा बसवण्यात यशस्वी होऊ. स्टंट करणे ही माझ्या कामाची पद्धत नाही अशी माहिती नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तेजस्वी सातपुते पुढे म्हणाल्या, सातारा शहराची ओळख ही शांत शहर म्हणून आहे, मात्र गेल्या काही वर्षात येथे गुन्हेगारी मूळ धरत असल्याचे दिसून येते. त्यावर संबंधित अधिकार्‍यांना उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या जातील. स्टंट करणे ही माझ्या कामाची पद्धत नाही. सहकार्‍यांना बरोबर घेऊन काम करण्यावर माझा भर राहील. जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून चांगल्या सुरू असलेल्या गोष्टी पुढे सुरू ठेवण्यावर माझा भर राहणार आहे. त्या संदर्भात कोणाच्या काही सूचना असतील तर त्यात त्यांनी निश्‍चितपणे कराव्यात. भविष्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कसा पायबंद घालता येईल, त्यादृष्टीने पावले उचलली जातील. अपप्रवृत्तींवर लक्ष ठेवण्याबरोबरच जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात येईल. मला या खुर्चीमध्ये निपक्षपाती काम करण्यासाठीच बसवले आहे. कायद्याच्या चौकटीत जे बसत आहे ते योग्य आहे, बसत नाही ते अयोग्य आहे याच धर्तीवर कामकाज केले जाईल. टीमवर्क, स्पिरीटवर माझा अधिक विश्‍वास आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तडीपार गुंड निदर्शनास आल्यास सातारकरांनी या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात असे आवाहन करून त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंद्यांना परवानगी मिळणार नाही. सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी आपण आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार आहोत. सध्या तरी आगामी निवडणुका जिल्ह्यामध्ये शांततेत कशा पार पडतील याला प्राधान्य दिले जाईल.
पुणे येथे गेल्या सहा महिन्यात आपण वाहतुकीच्या बेशिस्तीला लगाम घालताना,  बेस्ट एफर्ट दिले आहेत. यामुळे अनेक सकारात्मक बदलही झाले आहेत. पुणे येथे ज्या आयडिया वापरल्या तो अनुभव म्हणून सातार्‍यासाठीही वापरला जाईल. अर्थात त्याबाबतचा आढावा घेवून काय काय करता येईल, हे ठरवले जाईल. पोलीस हे समाजातील प्रत्येक घटकासाठी आधार आहेत. सातारकर निश्‍चित पोलिसांसोबत राहतील, त्याचप्रमाणे एसपी म्हणून कर्मचार्‍यांच्या पाठीशी मी कायम ठामपणे असेन असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, जगात गुन्हेगारी नाही असे कुठेही नाही.   
मात्र सातार्‍यात गुन्हेगारी कमी कशी राहील व त्यावर जास्तीत जास्त प्रतिबंध कसा राहील यावर आपला फोकस राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात असणार्‍या फलटण, कराड, सातारा या तिन्ही गुन्हेगारी सेंटरवर लक्ष केंद्रित करून बेसिक पोलिसिंगवर भर दिला जाईल.आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी गुंडांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल. तडीपार असणार्‍यांच्या तडीपारीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले जातील. जिल्ह्यात असलेल्या अवैध धंद्यांना त्या, त्या ठिकाणच्या प्रभारींनी आळा न घातल्यास क्रॉस रेडमध्ये अवैध धंदे सापडल्यास त्याचे परिणाम प्रभारी अधिकार्‍यांना भोगावे लागतील असा सज्जड दम त्यांनी जिल्ह्यातील कारभार्‍यांना दिला आहे.
संविधानाला अभिप्रेत काम करणार
जिल्ह्यात काम करणार्‍या यापूर्वीच्या एसपींना राजकीय दबावाचा सामना करावा लागल्याचे पत्रकरांनी सातपुते यांच्या निदर्शनास आणले. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, संविधानाला जे अभिप्रेत आहे तेच करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: