Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारतावर समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता : नौदल प्रमुख
ऐक्य समूह
Wednesday, March 06, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : नौसेना प्रमुख सुनील लांबा यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. भारताला अस्थिर करण्याच्या मानस असलेल्या एका देशाकडून मिळालेल्या मदतीच्या जोरावर कट्टरतावाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून आणला, असे लांबा म्हणाले. दहशतवादी सागरी मार्गाने देशात घुसण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
भारतात हल्ले घडवण्यासाठी दहशतवादी सागरी किंवा अन्य मार्गांचा वापर करू शकतात, असे सुनील लांबा म्हणाले. त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीदेखील आमच्याकडे उपलब्ध आहे, असे लांबा यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. याआधी दहशतवाद्यांनी 26/11 च्या हल्ल्यावेळी सागरी मार्गाचा वापर केला होता.
हिंदी-पॅसिफिक विभाग संवाद कार्यक्रमात सुनील लांबा बोलत होते. यावेळी संरक्षण क्षेत्राशी संबंधित विशेष तज्ज्ञ आणि राजदूत उपस्थित होते. आता नव्या प्रकारचा दहशतवाद दिसू लागला आहे. जगातील मोजकेच देश या प्रकारच्या दहशतवादापासून स्वत:चा बचाव करू शकले आहेत. दहशतवाद हे जगापुढील आव्हान आहे. जगासमोरील ही समस्या वाढतच आहे. दहशतवादाचे नवे स्वरूप आणि त्याची व्यापकता चिंताजनक आहे, असे लांबा म्हणाले.  भारत दहशतवादाचा पीडित असून ही समस्या अतिशय गंभीर असल्याचे नौदल प्रमुखांनी सांगितले. यावेळी त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर टीका केली. जवळपास तीन आठवड्यांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. भारताला अस्थिर करण्याचा मानस बाळगणार्‍या देशाच्या मदतीने दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला, असे लांबा यांनी म्हटले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: