Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मसूदच्या भावासह 44 जणांना अटक
ऐक्य समूह
Wednesday, March 06, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकची कारवाई
5इस्लामपूर, दि. 5 (वृत्तसंस्था) : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफसह बंदी असलेल्या या संघटनेच्या 44 दहशतवाद्यांना पाकिस्तानने अटक केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादाला प्रोत्साहन मिळता कामा नये आणि दहशतवाद्यांविरोधात सरकारने कारवाई करावी, असा जगभरातून दबाव आहे. या दबावामुळे व भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानने अखेर नमते घेत ही अटकेची कारवाई केल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान अफ्रिदी यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ व हमाद अझर यांना 44 जणांसह अटक करण्यात आल्याचे अफ्रिदी म्हणाले. भारताने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालामध्येही रौफ व अझरच्या नावाचा समावेश होता, असे ते म्हणाले. अर्थात कुणाच्याही दबावाखाली ही कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. बंदी घातलेल्या सगळ्या संघटनांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे अफ्रिदी यांनी सांगितले. देशामध्ये बंदी असलेल्या संघटनांवर कारवाई संदर्भात संयुक्त राष्ट्रांचे  काही निकष आहेत. या संदर्भातील कारवाईचे सुनियोजन करता यावे यासाठी पाकिस्तानच्या संसदेने सोमवारी एक कायदा मंजूर केला. या अंतर्गत बंदी घातलेल्या संघटनांची मालमत्ता व संपत्ती सरकारला ताब्यात घेता येणे सहजशक्य होते. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे शहरयार खान यांनी सांगितले. अर्थात, पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेला एअर स्ट्राइक तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पायलट अभिनंदनची 55 तासात सुटका या पाठोपाठ मसूद अझरच्या भावाच्या अटकेवरून पाकिस्तानला भारताची तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाची दखल घ्यायला भाग पडत असल्याचे चित्र आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: